ब्रॉस बॅण्ड पार्टीने फुलविले जीवन

राजेश दारव्हेकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शहरासह ग्रामीण भागातील सण, उत्‍सवात बॅण्ड पार्टीला महत्त्व आले आहे. याच माध्यमातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील चालतो. बॅण्ड पथकांची मागणी लक्षात घेता आता ग्रामीण भागातही पथक तयार झाले आहेत. ग्रामीण भागातही या पथकाला मागणी होत असल्याचे चित्र आहे.     

हिंगोली : लग्न कार्यासह विविध समारंभात वाजंत्रीचा आवाज आल्याशिवाय कार्य झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे प्रत्‍येक कार्यात बॅण्डचे महत्त्व वाढले आहे. शहरातील संगम ब्रॉस बॅण्ड ॲण्ड कॅशिओ पार्टीच्या माध्यमातून बारा जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायावर सर्वांच्या कुटुंबाचा घरसंसार चालत आहे.

शहरासह ग्रामीण भागातील सण, उत्‍सवात बॅण्ड पार्टीला महत्त्व आले आहे. याच माध्यमातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील चालतो. शहरातील मच्‍छी मार्केट भागात राहणारे ग्यानदेव सुतार हे चाळीस वर्षांपासून या व्यवसायात आहेत. वडिलोपार्जित असलेला व्यवसाय आता त्‍यांचा मुलगा विजय सुतार सांभाळत आहे. त्‍यांच्यासह संगम बॅण्ड पार्टीत बारा जणांचा समावेश आहे.

हेही वाचादोघांनी केला अत्याचार, एकाने बनवला व्हिडिओ

लग्नसराईत चार ते पाच महिने काम 

चार ते पाच महिने लग्नसराईत काम चांगले मिळते. त्‍यानंतर मात्र सण, उत्‍सवात मागणी असते. गणेशोत्‍सव, दुर्गा उत्‍सव, पोळा, दिवाळी, यासह महापुरुषांची जयंती, उत्‍सवास बॅण्ड लावण्यात येतो. यामुळे रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. लग्नसराईत आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत दोन दिवस काम मिळते. इतर कामांत मात्र दाम कमी मिळतो.

आर्थिक उलाढालीत वाढ

संगम बॅण्‍ड पार्टीत असलेल्या बारा जणांत दहावी, बारावी व पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण आहेत. यात ग्यानदेव सुतार, विजय सुतार, अमोल कांबळे, राहुल कांबळे, देवराव आठवले, संदीप कांबळे, संतोष घनघाव आदींचा समावेश आहे. लग्नातील वरात बॅण्ड पार्टीला आर्थिक उलाढालीत वाढ करून देणारी असल्याने वरातील खूप महत्त्व आहे. नुकताच पौष महिना संपल्याने लग्नसराई सुरू झाली आहे. 

लग्नाच्या तारखांची बुकिंग

आता जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे सर्व लग्नाच्या तारखांची बुकिंग झाली आहे. दरम्यान, शासनाच्या बॅंड पथकात सहभागी होण्यासाठी बॅंड पथकाच्या प्रमाणपत्राची गरज लागते. मात्र, बॅंडपथक नोंदणीसाठी अटी जाचक असल्याने अनेक बॅंड पथकचालकांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत.

येथे क्लिक करा - video- विद्यार्थी गिरवताहेत हसत खेळत शिक्षणाचे धडे

ग्रामीण भागातही बॅण्ड पथक

सण, उत्सव, जयंतीला बॅण्ड पथकाला मोठी मागणी असते. महापुरुषांची जयंती जिल्हाभरात एकाच दिवशी साजरी करण्यात येते. त्यामुळे बॅण्ड पथकांची बुकींग एक महिना अगोदरच करण्यात येते. अनेक वेळा बॅण्ड पथक उपलब्ध झाले नसल्याने जयंती मिरवणुका पुढे ढकलाव्या लागतात. बॅण्ड पथकांची मागणी लक्षात घेता आता ग्रामीण भागातही पथक तयार झाले आहेत. ग्रामीण भागातही या पथकाला मागणी होत असल्याचे चित्र आहे.     

 

अटी शिथिल कराव्यात

या व्यवसायत शिकलेले तरुण मोठ्या प्रमाणावर आहेत. त्‍यांना शासनाच्या विविध कार्यालयात असलेल्या बॅण्ड पथकात भरतीसाठी लागणारे प्रमाणपत्र बॅण्ड पार्टीतून द्यावे लागते. त्‍यासाठी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी शासनाने बॅण्ड पार्टी नोंदणीच्या अटी शिथिल करणे अपेक्षित आहे.
-विजय सुतार, चालक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bros. Band Party Fulfilled Life