भावावरच केले कुऱ्हाडीचे वार; कारण वाचून हैराण व्हाल...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

जिंतूर (जि.परभणी) तालुक्यातील सायखेडा येथील घटना

चारठाणा (जि.परभणी) : क्षुल्लक कारणावरून भावानेच भावाचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून केल्याची घटना सायखेडा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे मंगळवारी (ता. १९) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

जाधव कुटुंबातील रामराव जाधव व शेषराव जाधव या दोघा सख्या भावांत मंगळवारी शेतात शेळ्या चारू न देण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून दोघे एकमेकांच्या अंगावर धावले. रामराव (वय ५८) याने रागाच्या भरात भाऊ शेषराव (वय ५५) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यात शेषराव हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्यांना तातडीने जिंतूरला हालविले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शेषराव यांना परभणीकडे नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : जागतिक मधमाशी दिन : जगण्याची प्रेरणा देणाऱ्या मधमाशांचे अस्तित्वच धोक्यात...! 
 

खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताची पत्नी सावित्रा शेषराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामराव जाधवविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ताब्यात
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिंतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, चारठाणा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार, पोलिस उपनिरीक्षक पी. जी. अलापूरकर आदींनी घटनास्थळी येथे भेट देऊन आरोपी रामराव जाधव याला ताब्यात घेतले.

हेही वाचा ...
मानवतला व्यापाऱ्यावर कारवाई

मानवत (जि.परभणी) : कोरोना रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर व नागरिकांवर नगर परिषद प्रशासनाने दोन दिवसात कारवाई करून एकूण ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात मंगळवारी (ता.१९) अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसताना दुकान उघडल्याबदल चार व्यावसायिकांकडून आठ हजार रुपये व बुधवारी (ता.२०) आठ व्यावसायिकांकडून १६ हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय ग्राहकांत सुरक्षीत अंतर न ठेवणाऱ्या ९ दुकानदारांकडून चार हजार ५०० रुपये, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्याबद्दल २० नागरिकांकडून दोन हजार रुपये, 
तर सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आढळून आल्याबद्दल सात व्यक्तीकडून एक हजार ४०० रुपये असा एकूण ३१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : नांदेडला शंभरी पार : आज दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह, संख्या गेली १०६ वर
 

हेही वाचा ....
 दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
मानवत (जि.परभणी) :
मानवत शहरातील विविध जिनिंगमध्ये सध्या सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. गंगाधर देवराव होगे (वय ४५) (रा.नागर जवळा, ता.मानवत) हे ११ मे रोजी कापूस विक्री करण्यासाठी आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडून जात असताना परभणीवरुन मानवतच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या (क्रमांक एम. एच. - २२ ए. आर. - २६४२) या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. सुरवातीला मानवत शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १४ मे रोजी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.  या प्रकरणी मंगळवारी (ता.१९) संबंधित दुचाकीस्वाराविरोधात निष्काळजीपणे दुचाकी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother murdered brother Parbhani News