जागतिक मधमाशी दिन : जगण्याची प्रेरणा देणाऱ्या मधमाशांचे अस्तित्वच धोक्यात...! 

file photo
file photo

परभणी : मानवाला समुहाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या बहुगुणी मधमाशीमुळे पीक उत्पादनात सुमारे १५ ते ३५ टक्के वाढ होते व हे उत्पादन तुलनेने अधिक पौष्टिक असते. परंतु सद्य:स्थितीत रासायनिक
किडनाशकांचा अनिर्बंध वापर, जागतिक तापमान, कमी होत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती यामुळे मधमाशीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मिलींद सोनकांबळे व डॉ. अनंत बडगुजर यांनी बुधवारी (ता.२०) जागतिक मधमाशी दिनानिमित्त याच वेध घेतला आहे.


मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात ता. २० मे, १७३४ रोजी एका गरीब मधमाशीपालकाच्या कुटूंबात एन्टोन जान्सा या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपातील पहिले मधमाशी शिक्षण केंद्र सुरू केले व १७७१ मध्ये त्यांनी मधमाशी पालनावरील पहिले पुस्तक प्रसिध्द केले. १७७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयूक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, यानुसार २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून २०१८ पासून साजरा केला जावु लागला.

सर्वांवर मधमाशींचे मोठे उपकार
 मानवीजीवनातील मधमाशीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवून मधमाशीचे संरक्षण व संवर्धन व्हावे व मधमाशी प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील उदेश आहे. मधमाशी या किटकाला सामाजिक किटक म्हटले जाते. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही मधमाशा यात महत्वाची भुमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशींचे मोठे उपकार आहेत. मधासारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व धोक्यात असल्याचे डॉ. मिलींद सोनकांबळे यांनी सांगीतले आहे.

भारतात मधग्रहणाचे प्रमाण अत्यल्प 
राष्ट्रीय मधमाशी मंडळाची स्थापना भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाव्दारे सातव्या पंचवार्षिक योजनेत १९९४-९५ दरम्यान जनपथ, नवी दिल्ली येथे स्थापना झाली. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या सर्वसाधारण समितीत ६५० सदस्य आहेत. महाराष्ट्र हा पश्चिम क्षेत्राचा सदस्य आहे. मधमाश्या फुलातील पुष्परस गोळा करुन मध तयार करतात तसेच परागसिंचन करुन पिकांच्या उत्पादनातही लक्षणीय भर घालतात व देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालतात. राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या आकडेवारीनुसार सन २०१७-१८ साली भारतातील मध उत्पादन १.०५ लाख मैट्रीक टन होते. तसेच जानेवारी २०१९ पर्यंत ९०९१ नोंदणीकृत लोक हा व्यवसाय करत आहेत. जर्मनीमध्ये दरडोई मधग्रहणाचे प्रमाण १८०० ग्राम असूनतेच प्रमाण भारतामध्ये अत्यल्प आहे. केवळ ८ ग्राम आहे असे डॉ. बडगुजर यांनी सांगीतले.

अनेक रोगावर मध गुणकारी
मधमाशी व मध हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. फार वर्षीपासून मानवाला मधमाशांबाबत इत्यंभूत माहिती होती, असे दिसून येते. त्या दृ‌ष्टीने मधमाशां पाळून मधाचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने संशोधन झाले. त्यामधुन मधमाशाबाबतचे अनेक पैलू अवगत झाले व मधमाशी पालनाचे शास्त्रीकृत तंत्रज्ञान आज विकसित झाले आहे. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधातील आंबटपणामूळे उचकी व श्वसन संस्थेतील विकार दुर होण्यास मदत होते. मधामध्ये जीवनसत्व ‘बी’ चे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने अनेक रोग दुर होतात. आपल्या आहारात ज्या ठिकाणी साखर तुपाचा उपयोग केला जातो. तेथे मधाचा उपयोग करता येउ शकतो. साखर अधिक प्रमाणात घेतल्याने पोट फुगणे, अजीर्ण होणे, फोड येणे, मधुमेह होणे असे आजार होउ शकतात जर मधाच्या उपयोग केला तरा असे विकार होण्याचे टळू शकते. मध हा शीतल, मधुर, नेत्रास हितकारक, स्वर सुधारणारा, बुध्दीची धरणाशक्ती वाढविण्यासाठी मदत करते तसेच कोड, खोकला, पित्त, कफ, मेद, क्षय दुर करणारा आहे. 

पिक उत्पादनात हातभार
पिक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकिटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करुन घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उदिष्टसाध्य करणे शक्य होणार आहे. भारतासाठी तर शेतीत मधमाशांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वर्ष २०२२ पर्यंतदेशाचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयन्त सुरू आहेत. भारतातील विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक झाडेझुडपे व पिके याव्दारे अक्षयपणे मिळत राहणारा फुलोरा, समृध्द साधनसंपत्ती यांचा आधुनिक शास्त्रीय पध्दतीने योग्य उपयोग करुन घेता येईल. मधमाशी मुळे पीक उत्पादनात सुमारे १५ ते ३५ टक्के वाढ होते व हे उत्पादन तुलनेले अधिक पौष्टिक असते. 

किटकांच्या संख्येत वेगाने घट
सद्य:स्थितीत मधमाशी किटकांची संख्या मोठ्या वेगाने घटत आहे. रासायनिक किडनाशकांचा अनिर्बंध वापर, जागतिक तापमान, कमी होत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती ही त्यामागील कारणे आहेत.
- प्रा. डॉ. मिलींद सोनकांबळे, किटकशास्त्रज्ञ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com