VIDEO : चित्रांतून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा संदेश

मधुकर कांबळे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • जागतिक धम्म परिषद 
  • औरंगाबाद येथील मालती आर्ट गॅलरीतर्फे चित्रांचे प्रदर्शन 
  • अंधकारातून प्रकाशाकडे मार्गक्रमणाचा आशय
  • प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते उद््घाटन

औरंगाबाद - चित्रकारांच्या संकल्पनेतून तथागत बुद्धांनी सांगितलेला मध्यममार्ग, अंधकारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया, अत्त-दीप-भव असे बुद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित अनेक प्रसंगांचे आशय दर्शवणारी चित्रे तयार झाली आहेत. जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने काल्डा कॉर्नर येथील मालती आर्ट गॅलरीमध्ये चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

मालती आर्ट गॅलरीतर्फे बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित चित्रकारांनी एकत्रित येऊन बुद्ध तत्त्वज्ञानावर चित्रनिर्मिती करण्यात आली आहे. प्रा. विवेक लाड, रमेश औंधकर, मेघा पाध्ये, नंदकुमार जोगदंड, निखिल राजवर्धन, सचिन करणकाळे, गणेश गुळे, हर्षद खांड्रे, सोपान करवंदे, ज्योती बोदडे, बाबा जगताप, सुनीता मोरे, अनिता स्वामी, आशा बोबडे, प्राचार्य रवींद्र तोरवणे,
बाबा जगताप, कैलास मगरे, कैलास खानजोडे, इमरान यांची चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. इमरान नावाच्या चित्रकाराने विणेच्या तारेचे माध्यम निवडून विणेची तार कमी छेडली तर आवाज येत नाही आणि जास्त ताणली तर ती तुटून जाते असा संदर्भ देत तथागतांनी सांगितलेला मध्यममार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.

यातून माणसाने मध्यममार्गी कसे असावे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे मार्गक्रमणाचा आशय सांगणारे, गृहत्याग केल्यानंतर राजत्याग करताना सिद्धार्थ गौतमाने त्यांचा लाडका अश्‍व कंथक याला निरोप दिला त्यावेळी कंथकाचे पानावलेले डोळे, सिद्धार्थ गौतमाचे चुलतबंधू देवदत्ताने राजहंसाला बाण मारून जखमी केल्यानंतर त्याला वाचवणारे सिद्धार्थ गौतम, मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याचा जास्त अधिकार असतो हे सांगणारे चित्र, आधी स्वत: समजून घ्या. अत्त, दीप, भव असा संदेश देणारे, ज्ञानप्राप्तीनंतरचे तथागतांचे पंचशील, ध्यानधारणेला बसल्यानंतर त्यांच्या ध्यानधारणेत अडचणी आणणारे मोह, माया, काम, वासना यांचे प्रतीकात्मक चित्र तर तथागत बुद्धांच्या चेहऱ्यात त्यांची आई महामाया, तथागतांना खीर पाजून नवविचार देणारी सुजाताचे प्रतिबिंब दिसणारे चित्र अशा अनेक आशयांची चित्रे चित्रकारांनी रेखाटली आहेत.

चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. हे प्रदर्शन एक डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुले राहणार असून, याचा जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने शहरात आलेल्या अधिकाधिक बौद्ध उपासकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आर्ट गॅलरीचे नंदकुमार जोगदंड यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या -
सर्वधर्म समभाव जगाने भारताकडून शिकावा : दलाई लामा

बुध्दांचे मानवता आणि शांतीचे तत्वज्ञान जगाला मान्य
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buddha's Thoughts Painting Exhibition at Aurangabad