Budget 2020 - अर्थसंकल्पाबाबत ‘काय’ म्हणतात नांदेडकर...वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता. एक फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याबद्दल नांदेडमधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी मते मांडली आहेत. 

नांदेड -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता. एक फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नांदेडमधील कृषि, उद्योग, शिक्षण, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी याबाबत आपली मते मांडली आहेत. काहींनी स्वागत केले आहे तर काहींनी फक्त घोषणा नको तर अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

बळीराजांच्या हाती नेहमीप्रमाणे भोपळा ः शंकरअण्णा धोंडगे
केंद्र शासनाचा हा अर्थसंकल्प म्हणजे नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आहे. यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस काहीही नाही. उलट आपली कृषी प्रधान देश अशी असलेली ओळख बुडीत निघाली आहे. मागील सहा वर्षापासून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगत आहे. परंतु सध्या शेती क्षेत्राचा विकासदर अडीच टक्क्यांवर आला आहे. शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीचा विकास दर १६ ते १८ टक्क्यांवर न्यावा लागेल. यासाठी बाजार, किंमत, प्रक्रीया व्यवस्था यासह पतधोरण महत्वाचे आहे. शेतीसाठी बजेट जाहीर केल जात. पण बॅंका शेतीसाठी पैसे देत नाहीत. तरतुदीच्या २० ते २५ टक्केच वाटप होते. केंद्राच्या धोरणामुळे कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा एकही ठोस कार्यक्रम राबविण्यात आला नाही. केवळ संकल्पणा मांडायच्या त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणुक केल्याशिवाय विकास होणार नाही. कृषीसाठी ठोस निधी, निर्यातीचे धोरण महत्वाचे आहेत. रेडीरेकनरच्या सत्तर टक्के शेतीवर कर्ज दिले जाहीजे. रोजगार हमी योजनेत शेतीची पेरणी ते काढणीपर्यंतच्या कामाचा समावेश महत्वाचा आहे. असे होताना दिसत नाही.
- शंकरअण्णा धोंडगे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी किसान भारती. 

हेही वाचा - Budget 2020 : जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण

सर्वसामान्यांना दिलासा ः शिवप्रसाद राठी
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत देश असून तो पाचव्या स्थानावर आहे. विविध वस्तूंवरील कर घटल्याने लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा मिळणार आहे. जीएसटीमुळे एकच टॅक्स लागू झाला असला तरी त्यात आणखी सुधारणेला वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. एकंदरीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. इन्कमटॅक्स मध्ये झालेल्या बदलाचा फायदा नोकरदार तसेच उद्योजकांना फायद्याचा आहे. 
- शिवप्रसाद राठी, प्रदेश उपाध्यक्ष, उद्योग आघाडी.

महिलांना दिलासा हवा - अॅड. वृषाली जोशी
सध्या महागाई वाढत चालली असून अन्नधान्य, भाजीपाला, गॅस सिलेंडर असे दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे भाव कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. ते वाढणार नाहीत, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. महिलांसाठी महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे कारण त्यांना घर चालवताना आर्थिक परिस्थितीची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे महिलांचे घराचे आर्थिक बजेट कोलमडणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिलांसाठी २८ हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मिळाली असून ही चांगली बाब आहे. तसेच त्याची अंमलबजावणीही होणे गरजेचे आहे. 
- अॅड. वृषाली जोशी, नांदेड.

हेही वाचले पाहिजे - Budget 2020:बजेटमध्ये तेच ते आणि तेच ते; राहुल गांधींची टीका

आॅनलाइन पदवीचा चांगला निर्णय - भगवान देशमुख
अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार तीनशे कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन पदवी हा घेतलेला निर्णय चांगला आणि महत्वपूर्ण आहे. यामुळे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्या कमी होतील. ग्रामिण भागातील सर्व संस्था आॅनलाइन केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामिण भागावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतरांना आॅनलाइन माहिती सहजरित्या उपलब्ध होईल व ग्रामिण भागाचा विकास होण्यास मदत होईल. 
- भगवान देशमुख, संशोधक विद्यार्थी.

युवकांकडे लक्ष द्यावे ः गणेश मनी
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे हाताला काम देणाऱ्या नोकऱ्या आणि उद्योगांची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. रोजगार निर्मितीवर भर आणि तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारने अर्थसंकल्पात केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीही आवश्‍यक आहे. नोकऱ्या मिळण्यासाठी तसेच छोटे मोठे उद्योग उभारणीसाठी बेरोजगार युवकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. 
- गणेश मनी, पदव्युत्तर विद्यार्थी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget 2020 - Nandedkar says 'what' about budget ... Read ..