esakal | सर्जाराजाची जोडी लयभारी! लातुरातील नळेगाव येथील बाजारात मिळाला सोन्याचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Nalegaon Cattle Market

शेतीमध्ये आलेले यांत्रिकीकरण, त्याच्या जोडीला सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे बैलजोड्या कमी झाल्या आहेत.

सर्जाराजाची जोडी लयभारी! लातुरातील नळेगाव येथील बाजारात मिळाला सोन्याचा भाव

sakal_logo
By
अशोक बिराजदार

नळेगाव (जि.लातूर) : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यंत्राच्या साहाय्याने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. याच काळात चांगल्या बैलांना आजही चांगली किंमत मिळत आहे. येथील एका बैलजोडीला सोन्याचा भाव मिळाला आहे. चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील जनावरांच्या बाजारात बैलजोडीला विक्रमी किंमत मिळाली आहे.

शेतीमध्ये आलेले यांत्रिकीकरण, त्याच्या जोडीला सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे बैलजोड्या कमी झाल्या आहेत. सातत्याने निर्माण होणारा चारा, पाण्याचा प्रश्न, पालन पोषणाचा वाढलेला खर्च आदीमुळे दावणीला असणाऱ्या जातीवंत बैलजोड्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र काही शेतकरी आजही जातिवंत बैलजोडया सांभाळत आहेत.


नळेगाव येथील प्रमोद बिराजदार हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे. शेतीमध्ये काम करण्यासाठी दोन सालगडी आहेत. गायीचे लहान वासर घेऊन त्याचे पालनपोषण करतात. त्यांच्या कडील देवणी जातीच्या बैल जोडीला नळेगाव येथील जनावरांच्या बाजारात एक लाख ८१ हजार रुपये विक्रमी किंमत मिळाली आहे.


येथे दर मंगळवारी जनावरांचा आठवडे बाजार भरतो. जनावरांचा बाजार मराठवाड्यातील प्रसिद्ध बाजार म्हणून ओळखला जातो. या बाजारात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांतून व्यापारी येतात. दर बाजारी जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल होते. या बाजारात म्हैस, खिलार व देवणी जातीच्या गोवंशाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. पाणी, चाराटंचाई, वाढलेला अन्य खर्च यामुळे जनावरांची योग्य निगा राखणे अवघड बनले आहे. त्यामुळे बैल बाळगण्याचा कल कमी होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर