मावेजासाठी पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू, मुर्दाड प्रशासनामुळे गेला जीव

दत्ता देशमुख
Wednesday, 25 November 2020

मावेजासाठी १५ वर्षांपासून कार्यालय आणि मंत्रालयात खेटे मारूनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याने अखेर पाटंबधारे कार्यालयाच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना मंगळवारी (ता.२४) शहरात घडली. या शेतकऱ्याचा बुधवारी (ता.२५) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बीड : बिंदुसरा प्रकल्पालगत कर्मचारी वसाहतीसाठी तालुक्यातील पाली येथे संपादित केलेल्या जमिनीपैकी दहा गुंठे क्षेत्र कमी दाखवले. दरम्यान, मावेजासाठी १५ वर्षांपासून कार्यालय आणि मंत्रालयात खेटे मारूनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्याने अखेर पाटंबधारे कार्यालयाच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना मंगळवारी (ता.२४) शहरात घडली. या शेतकऱ्याचा बुधवारी (ता.२५) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अर्जुन कुंडलिक साळुंके (वय ५०, रा. पाली, ता. बीड) असे मृताचे नाव आहे. यात ते ८० टक्क्यांहून अधिक भाजले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

वर्ष १९५६ मध्ये तालुक्यातील पालीजवळ बिंदुसरा प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी प्रकल्पालगतच कर्मचारी वसाहतीसाठी दोन हेक्टर सहा गुंठे जमीन पाटबंधारे विभागाने संपादित केली. यामध्ये अर्जुन साळुंके यांच्या आई राधाबाई कुंडलिक साळुंके यांच्या जमिनीचा समावेश होता. तेव्हा त्यांना ३४ गुंठ्याचा मावेजाही दिला होता. मात्र, त्यांच्या मूळ सातबारा उताऱ्यावर ३४ ऐवजी ४४ गुंठे जमीन संपादित केल्याची नोंद झाली. ही बाब अनेक वर्षे साळुंके कुटुंबीयांच्या निदर्शनास आली नाही. दरम्यान, राधाबाई यांचे पती कुंडलिक साळुंके यांचे निधन झाले. वर्ष २००५ मध्ये संपादित क्षेत्रापेक्षा १० गुंठे जादा जमीन सातबारा नोंदीवरून कमी झाल्याची बाब निदर्शनास आल्यावर राधाबाई व अर्जुन या मायलेकाने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला.

मात्र, अद्यापही त्यांच्या सातबारा व फेरफारवर दुरुस्ती झाली नाही. शिवाय मावेजाही मिळाला नाही. पाटबंधारे, भूमिअभिलेख ते आयुक्त कार्यालयापर्यंत अर्ज फाटे करूनही न्याय न मिळाल्याने साळुंके यांनी १३ ऑक्टोबर २०२० ला मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून पाटबंधारे कार्यालयासमोर १६ ऑक्टोबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या उपरही योग्य कार्यवाही न झाल्याने अखेर मंगळवारी अर्जुन साळुंके यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा रुग्णालयासमोरील पाटबंधारे कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. सुरक्षारक्षकासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावर पोते टाकून आग आटोक्यात आणली. यामध्ये त्यांचे संपूर्ण शरीर होरपळून निघाले.

आईचाही आत्मदहनाचा प्रयत्न; चार वेळा अटक
अर्जुन यांच्या आई राधाबाई साळुंके यांनीही याप्रकरणी मोठा पाठपुरावा केला. त्यांनीही न्यायासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, त्या उपरही काही न झाल्याने वर्ष २०१६ मध्ये त्यांनी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. न्यायासाठी त्यांनी केलेल्या विविध आंदोलनांमुळे त्यांना चार वेळा अटक झाली होती. त्यांच्या निधनानंतर अर्जुन यांनी पाठपुरावा सुरू केला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burned Farmer Died While Taking Treatment Beed News