स्मार्ट सिटी बससाठी बस-बे थांबे निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

औरंगाबाद - स्मार्ट सिटी बसच्या शहरातील प्रत्येक थांब्यावर थांबण्याच्या जागा (बस-बे) निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पिवळ्या पट्ट्यांचे बॉक्‍स तयार केल्याने या
बॉक्‍सच्या ठिकाणी शहर बस थांबणार असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी आता धावपळ करण्याची गरज राहिली नाही. 

औरंगाबाद - स्मार्ट सिटी बसच्या शहरातील प्रत्येक थांब्यावर थांबण्याच्या जागा (बस-बे) निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पिवळ्या पट्ट्यांचे बॉक्‍स तयार केल्याने या
बॉक्‍सच्या ठिकाणी शहर बस थांबणार असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी आता धावपळ करण्याची गरज राहिली नाही. 

शहरात स्मार्ट शहर बस सुरू करण्यात आल्यानंतर हळूहळू ही सेवा विस्तारत आहे. 23 जानेवारीपासून बससेवा सुरू झाली. आतापर्यंत 36 बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या एकूण 530 फेऱ्या चालवण्यात येत आहेत. यासाठी एसटीच्या कोकण विभागातून बदलीने आलेले 19 चालक आणि सहा वाहक रुजू झाले आहेत. सध्या 219 चालक आणि 188  वाहक स्मार्ट सिटी बससाठी कार्यरत आहेत. आणखी 31 वाहकांची आवश्‍यकता आहे, हे वाहकही लवकरच दाखल होणार आहेत. लवकरच म्हणजे एप्रिल अखेर आणखी साठ स्मार्ट सिटीबस येणार असून, स्मार्ट सिटी बसच्या अधिकाऱ्यांनी धारवाडमध्ये (कर्नाटक) जाऊन तयार होणाऱ्या या बसची तांत्रिक तपासणी केली आहे. येत्या महिनाभरात या बसही रस्त्यावर धावणार आहेत. 
 

प्रवाशांची धावपळ थांबणार 
शहरात बस थांबण्यासाठी आतापर्यंत जागा निश्‍चित नव्हत्या. त्यामुळे चौकामध्ये कुठेही बस थांबत असल्याने आजूबाजूला थांबलेल्या प्रवाशांना धावपळ करावी लागत होती. अनेक वेळा बसपर्यंत पोचेपर्यंत बस निघून जाण्याचे अनुभव प्रवाशांना घ्यावे लागत होते. म्हणूनच प्रत्येक चौकामध्ये पिवळ्या चौकोणी बॉक्‍सचे मार्किंग केले आहेत. या ठिकाणी सिटी बस थांबवली जाणार आहे. 
 
लवकरच स्टॅडपोस्ट 
स्मार्ट सिटी शहर बससाठी नागरिकांना बसचे वेळापत्रक आणि बसचे मार्ग समजावेत यासाठी बसपोल (स्डॅडपोस्ट) लावण्यात येत आहे. 150 स्टॅडपोस्टची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बसथांब्यांच्या ठिकाणी स्टॅडपोस्ट लावण्याच्या कामाला सुरवात करण्यात येणर असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

Web Title: Bus-bay for smart city bus