व्यावसायिकाला चार लाखांनी फसविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - लग्नासाठी बुकिंग केलेल्या रिसॉर्टची नियोजित तारीख परस्पर बदलली. त्यादरम्यान चार लाख साठ हजार रुपये खात्यात भरायला सांगत शहरातील व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणात मुंबईच्या एजन्सीमालकासह गोवास्थित हॉटेलच्या संचालकावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. दोन) गुन्ह्यांची नोंद झाली.

औरंगाबाद - लग्नासाठी बुकिंग केलेल्या रिसॉर्टची नियोजित तारीख परस्पर बदलली. त्यादरम्यान चार लाख साठ हजार रुपये खात्यात भरायला सांगत शहरातील व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणात मुंबईच्या एजन्सीमालकासह गोवास्थित हॉटेलच्या संचालकावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. दोन) गुन्ह्यांची नोंद झाली.

राजू पी. लालचंद मनकाणी हे सिंधी कॉलनीत राहतात. रिचमंड ट्रेडिंग कंपनी नावाने भागीदारीत ते कंपनी चालवतात. त्यांचा मुलगा सनी याचे जानेवारी 2016 ला लग्न जमले. हे लग्न 18 एप्रिल 2016 ला गोवा येथे करायचे ठरले. मुंबईस्थित प्लॅनेट हॉस्पिटॅलिटी संस्थेबद्दल त्यांना माहिती मिळाली, की
लग्नसमारंभासाठी एजंट म्हणून ते काम करतात. या आधारावर त्यांनी प्लॅनेट हॉस्पिटॅलिटी संस्थेच्या अशोकलाल याच्याशी संपर्क साधला.

संस्थेमार्फत त्यांना बोलावल्यानंतर ते दोन फेब्रुवारीला मुंबईस्थित संस्थेच्या कार्यालयात मुलगा रवीसह गेले व अशोकलाल याची भेट घेतली. हॉटेल केनील वर्थ रिसॉर्ट आणि स्पा गोवाबद्दल माहिती देत हे दर्जेदार हॉटेल असल्याचे त्यांना अशोकलालकडून सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच "गोवा येथे जाऊ,' असे सांगत अशोकलाल याने तगादा लावला. त्याच दिवशी ते गोवा येथे गेले. तेथे हॉटेलच्या मालकासोबत तोंडओळख करून दिली; पण नाव सांगण्याचे अशोकलालकडून टाळण्यात आले. अधिक बोलणीसाठी संचालक संजय श्रीवास्तव या व्यक्तीची त्याने भेट घडवून दिली. सतरा एप्रिल ते एकोणवीस एप्रिल 2016 या तीन दिवसांसाठी त्यांनी रिसॉर्ट बुक करून 95 खोल्या भाड्याने घेतल्या. तत्पूर्वी संचालकाला अनामत 25 हजार रुपये रक्कम दिली. त्यानंतर एकूण चार लाख साठ हजार रुपये घेतले; परंतु ठरलेल्या बाबी अचानक अमान्य केल्या. तसेच बुकिंग केलेली तारीख परस्पर बदलली, त्यानंतर मनकाणी यांना करारातील बाबी मान्य असल्याचे भासवत अशोकलाल याने बनावट दस्ताऐवज बनवले व परस्पर सह्या केल्या. या बाबी माहिती झाल्यानंतर मनकाणी यांनी पैशांची मागणी केली; पण त्यांना संचालकाकडून पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे प्लॅनेट हॉस्पिटॅलिटी संस्थेचा मालक व रिसोर्टचा संचालक संजय श्रीवास्तव (रा. गोवा) याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपले पैसे हडप करण्यासाठी दोघांनी ही उठाठेव केल्याचे तक्रारीत मनकाणी यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक केदारे करीत आहेत.

Web Title: Businessman deceived four lac