संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबेंच्या  जिल्हा परिषद गटात होणार पोटनिवडणूक 

संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबेंच्या  जिल्हा परिषद गटात होणार पोटनिवडणूक 

बीड - जिल्हा परिषद सदस्य असलेले संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने नवगण राजुरी व कडा या दोन गटांत पोटनिवडणूक होणार हे निश्‍चित आहे. तर, पक्षाचा व्हिप डावलल्याने ग्रामविकासमंत्र्यांनी अपात्र ठरविल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागितलेले पाच सदस्यही राजीनामे देऊन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत खल सुरू आहे. यातील मंगल गणपत डोईफोडे यांचा निर्णय वेगळा होऊ शकतो. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 11 नोव्हेंबरच्या सुनावणीनंतर याबाबत निर्णय होणार आहे. 


जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेल्या आमदार सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांनी थेट भाजपला मदत केली होती. तर, जयदत्त क्षीरसागर समर्थक मंगल डोईफोडे गैरहजर होत्या. पक्षाचा व्हिप डावलल्याने अपात्र करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व मंगला सोळंके यांच्या याचिकेवरून तत्कालीन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सहा सदस्यांना अपात्र केले होते. याविरोधात या सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागितली होती. मंत्री पंकजा मुंडे यांनी यातील अपक्ष विजयी झालेल्या अश्विनी निंबाळकर वगळता संगीता महारनोर, अश्विनी जरांगे, प्रकाश कवठेकर, शिवाजी पवार व मंगल डोईफोडे यांना अपात्र केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयाला या सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली आहे.

खंडपीठाने मानधन, भत्ते आणि मतदानाचा अधिकार काढून या सदस्यांना बैठकीत सहभागाला परवानगी देत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर पुढची सुनावणी ता. 11 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र, आता राजीनामे देऊन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा खल धस गटात सुरू आहे.

या सुनावणीत समोर येणाऱ्या बाबीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे कदाचित अश्विनी निंबाळकर, संगीता महारनोर, प्रकाश कवठेकर व शिवाजी पवार हे धस समर्थक राजीनामे देऊ शकतात. त्यामुळे वरील सदस्यांच्या धानोरा, अंमळनेर, डोंगरकिन्ही व पाडळी या गटात पोटनिवडणूक होण्याची दाट शक्‍यता आहे. तर, क्षीरसागर समर्थक मंगल डोईफोडे यांच्या निर्णयाबाबत अनिश्‍चितता आहे. संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाचे दिलेले राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यांच्या राजुरी (न.) व कडा गटात तर पोटनिवडणूक निश्‍चितच आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com