पंकजा मुंडेंची पोस्ट केवळ समर्थकांना भावनिक आवाहन 

दत्ता देशमुख
Tuesday, 3 December 2019

भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून सध्या परिस्थितीनुरूप राजकीय अर्थ निघू लागले आहेत. मात्र, पंकजा मुंडे भाजपमध्ये काही प्रमाणात नाराज असल्या तरी विद्यमान परिस्थिती पाहता इतर पक्षात त्यांना त्यांच्यायोग्य जागा मिळेल का, असाही प्रश्‍न आहे. तसेच, वडिलांनी ज्या पक्षात हयात घालविली तो पक्ष त्या कसा सोडतील? असाही प्रश्‍न आहे. 
 

बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ समर्थकांना केलेले भावनिक आवाहन असून पंकजा कुठलीही वेगळी राजकीय भूमिका घेतील, असे नाही.

पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून चुलतबंधू धनंजय मुंडे यांच्याकडून 30 हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर पराभव स्वीकारत जबाबदारीही स्वतःवर घेतली; परंतु अद्याप त्या जिल्ह्यात आणि एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. त्यातच तीन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली आणि पोस्टमधील काही शब्दांमुळे त्या पक्षांतर करतील, भाजपमध्ये नाराज अशा विविध चर्चा आणि बातम्या सुरू झाल्या. त्यातच त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून भाजपचा उल्लेख काढल्याने ही चर्चा अधिकच रंगू लागली. मात्र, 12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असून यानिमित्त समर्थकांना गोपीनाथगडावर उपस्थितीचे आवाहन करण्यासाठी ती पोस्ट लिहिलेली आहे.

हेही वाचा - पंकजा मुंडेंच्या राजकीय भूमिकेवर सस्पेन्स, फेसबुकवर पुन्हा आलं कमळ!

पंकजा मुंडे भाजपमध्ये काही प्रमाणात नाराज असल्या तरी विद्यमान परिस्थिती पाहता इतर पक्षात त्यांना त्यांच्यायोग्य जागा मिळेल का, असाही प्रश्‍न आहे. तसेच, वडिलांनी ज्या पक्षात हयात घालविली तो पक्ष त्या कसा सोडतील? असाही प्रश्‍न आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्यांच्या शब्दांना भावनिक झालर असल्याने वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्यांच्या त्या भावनिक राजकारण करतात, असा विरोधकांचा आरोप आणि आपण भावनेने राजकारण करतो, असा पंकजा मुंडेंचा दावा राहिलेला आहे. त्यामुळे ही पोस्टदेखील तशीच काहीशी आहे.

हेही वाचा - फडणवीसांना सत्तेचा दर्प - शरद पवार

भगवानगडावर दसरा मेळाव्याला विरोध झाल्यानंतर त्यांनी भगवान भक्तीगडावर पहिला मेळावा घेताना गोपीनाथगडाची उभारणी करताना समर्थकांना आवाहन करणाऱ्या पोस्ट अशाच पद्धतीच्या होत्या. त्यामुळे पराभवानंतर समर्थकांसोबत निर्माण झालेला दुरावा, राज्यात आणि जिल्ह्यात झालेले सत्तांतर आणि भविष्यातील राजकारण हे टप्पे करण्यासाठी त्यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ताकद दाखवावी लागणार हे निश्‍चित असून त्यासाठीच त्यांनी समर्थकांना भावनिक आवाहन केले आहे. त्या पोस्टमधून निघणाऱ्या अर्थाने भाजपमध्ये सुरू झालेली चलबिचल तशी पंकजा मुंडेंच्या भविष्यासाठी चांगलीच राहणार आहे.  

हेही वाचा - पीएम मोदींना माझ्या वडिलांनी विनम्रपणे नकार दिला

 आता कोणाला बोलविणार, याकडेही लक्ष 
दरम्यान, गोपीनाथगडाची उभारणी झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या आतापर्यंतच्या जयंती कार्यक्रमावेळी भाजप सत्तेत आणि पंकजा मुंडे मंत्री होत्या. त्यामुळे आतापर्यंत अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मातब्बर नेते इथे कार्यक्रमाला येत होते. त्या वेळी राष्ट्रवादीत असलेले उदयनराजे भोसले यांनीही गडावर हजेरी लावली होती. आता या वेळी जयंती कार्यक्रमाला पंकजा मुंडे कोणाला बोलविणार? याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde really upset?