संकटाच्या महापुरातही टिकून राहता येते : कसे, ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नवे विचार ऐकावेत, नव्या अभ्यास पद्धती ,मजून घ्याव्यात, बदलणाऱ्या नव्या परीक्षा पद्धतीचा वापर करावा, अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांकडून होताना दिसत नाहीत. पर्यायाने अपयश येते. या सर्वांतून बाहेर पडायचे असेल तर बदलाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नांदेड : बदल हा निसर्गाचा नियम असला तरी काही जणांना बदल स्वीकारता येत नाहीत. एका छोट्याशा बदलानेही अनेकांचे भावनिक व मानसिक संतुलन बदलते. स्पर्धा परीक्षेचा परीघ, त्यातील प्रश्‍नाचे स्वरूप वर्षागणिक बदलत चालले आहे. या क्षेत्रात करिअर करण्याची मनीषा असलेल्या तरुणांनी नवे बदल हाताळण्याचे कौशल्य अंगी बाणवलेच पाहिजे. शेवाळाची लवचिकता अंगी असेल तरच संकटाच्या महापुरातही आपण टिकून राहू शकतो.

बदलांकडे होतेय दुर्लक्ष
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बऱ्याच तरुणांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. या अपयशाच्या अनेक कारणांपैकी बदल हाताळण्याची क्षमता नसणे, हे अपयशाचे एक प्रमुख कारण आहे. राज्य आणि देश पातळीवर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा नीट अभ्यास केला तर बदललेली परीक्षा पद्धतीत वाढत जाणारी काठिण्य पातळी आपल्या लक्षात येईल; पण बरेच तरुण हे या बदलाबाबत पुरेसे जागरूक नसतात. केवळ स्वतःला अभ्यासात गाढून घेणे एवढेच त्यांना माहित असते. बदलाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अशा तरुणांना अपेक्षित निकाल मिळत नाहीत. यश मिळवणे ही पद्धतशीर प्रक्रिया आहे. त्याचे एक शास्त्र^असू शकते. हे अनेकांच्या गावीही नाही. असे शेकडो तरुण केवळ पारंपरिक पद्धतीचा आणि तंत्राचा अनेक दिवस वापर करीत राहतात.  

हेही वाचा - ​मनावर ताबा ठेवला तरच जीवनात सुख: भदंत धम्मसेवक

बदल स्वीकारण्याचे फायदे
बदलासाठी तयार असणे हे बदल स्वीकारण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल. बाकीच्या कौशल्याइतकेच हे कौशल्यही महत्त्वाचे आहे. योग्य वयात ते अंगीकृत केले की, याचे फायदेच अधिक वाट्याला येतील. नव्या बदलांमध्येच यशस्वी होण्याची बीजे असतात. मानवी स्वभाव हा बदलासाठी पटकन तयार होत नाही. कारण कोणत्याही पद्धतीत बदल करणे आणि झालेला बदल आत्मसात करणे बऱ्याच जणांना जिकिरीचे वाटते. त्यामुळे बदलापासून दूर राहण्याकडेच अनेकांचा कल असतो.बदल स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. काही मुलांना बदल झाला आहे. हेच उशिरा कळते. अशा अनेक कारणांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी बरीचशी मुले बदल हाताळण्यात कमी पडतात, पर्यायाने अपेक्षित निकाल हाती येत नाही.

हे देखील वाचायलाच पाहिजे अशोक चव्हाण कोणाला म्हणाले... मेरे सपनो की रानी कब आयेगी तू.....

चला हे करुया...

  1. कोणताही बदल हा पटकन होत नसतो. बदलासाठी विशिष्ट पार्श्‍वभूमी तयार व्हावी लागते. बदलाबाबत अचूक अंदाज बांधणे ही या कौशल्याची पहिली पायरी होय. त्यासाठी आपण सतत बातमी आणि आयोगाच्या वेबसाइट अधूनमधून तपासाव्यात.
  2. बदलामुळे आपल्याला स्वतःच्या क्षमतेमध्ये काय बदल करावा लागेल याचा अंदाज बांधून तशी क्षमता मिळवल्यास, बदल स्वीकारताना त्रास होणार नाही. बदलाचे चांगले-वाईट परिणाम ओळखण्याची जाण असणे केव्हाही चांगले. त्यामुळे परिणामाची तीव्रता कमी करता येईल.
  3. कोणताही बदल मन तेव्हाच स्वीकारते, जेव्हा बदलाला समाजमान्यता मिळते. त्यामुळे कायम सकारात्मक विचाराच्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहा.
  4. वेगवेगळ्या जीवन कौशल्याचा विकास करता आला, तर कोणत्याही बदलासाठी आपण सतत तयार राहतो. बदलाची भीती वाटत नाही.
  5. छोट्या-छोट्या गोष्टीतूनच बदल स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can Survive Even in the Midst of Crisis Nanded News