​मनावर ताबा ठेवला तरच जीवनात सुख: भदंत धम्मसेवक 

dhamma parishad
dhamma parishad

हिंगोली : भगवान गौतम बुद्धांचा मार्ग आचरणात आणून प्रत्येकाने प्रज्ञा, शिल समाधीचे आचरण करावे, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आचरणानुसार मनावर ताबा ठेवला तरच जीवनात सुख प्राप्त होईल, असे प्रतिपादन मुळावा येथील भदंत धम्मसेवक महास्थवीर यांनी केले. हिंगोली शहराजवळ असलेल्या अंधारवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे आयोजित बौद्ध धम्‍म परिषदेत गुरुवार (ता. १३) ते बोलत होते. 

पहिल्या सत्रात ध्वजवंदन भदंत काश्यप महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. दुसऱ्या सत्रात धम्म परिषदेचे उद्‌घाटन औरंगाबाद येथील धम्मबोधी महास्थवीर यांच्या हस्ते करण्यात आले. धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महास्थवीर हे होते. या वेळी भदंत काश्यप महाथेरो, भिक्खू धम्मबोधी थेरो (औरंगाबाद), भिक्खू प्रज्ञापाल (वाशीम), भिक्खू पय्यानंद (लातूर), भिक्खू धम्मशील, भिक्खू महामोग्गलायन (मुंबई), भिक्खू कमलधम्मो (कराड), भिक्खू रोहन (औरंगाबाद), भिक्खू शीलानंद (लातूर), भिक्खू मुदितानंद (परभणी), भिक्खू संघप्रिय (नांदेड) जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, पंचायत समितीच्या सभापती सुमन झुळझुळे आदींची उपस्थिती होती.

भिक्खूंची धम्मदेशना

या वेळी अनेक भिक्खूंची धम्मदेशना झाली. भदंत धम्मसेवक थेरो म्हणाले, ‘‘प्रत्येक मानवाने प्रज्ञा, शिल, करुणा आचरणात आणली तर सुख नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच शिलचा अलंकार अंगावर कसा घातला पाहिजेत याची भगवान बुद्धांनी शिकवण दिली आहे. इंद्रियांवर संयम ठेवून शिलचे पालन केले पाहिजे. तेव्हाच मन प्रसन्न दिसते. डोळ्यांनी अंतर्मनात पाहिले तर सर्व शरीर जाणून घेत मनावर संयम ठेवत बुद्धांचा सन्मार्ग अवलंबिल्यास जीवनात सुख नक्कीच मिळते.’’

विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत

प्रत्येक माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. ज्या लोकांमध्ये आचरणात अभिवादन करण्याची क्षमता आहे, त्यांचेच अनुसरण करणे योग्य ठरते. धम्म परिषदांमधून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व धम्मदेशना प्रत्येकाने ऐकून आचरणात आणली तर सुखाचा मार्ग प्राप्त होतो, असे भदंत धम्मसेवक यांनी सांगितले. सूत्रसंचालन भिक्खू पय्यानंद यांनी केले. आभार प्रकाश इंगोले यांनी मानले. धम्म परिषदेसाठी सुप्रिया महिला मंडळ व संयोजन समितीचे आंबादास वानखडे, नंदकिशोर कांबळे, प्रभाकर डोंगरे, जळबा शेवाळे यांच्यासह सहसंयोजक भिक्खू धम्मशील आदींनी पुढाकार घेतला.

गुणवंतांचा सत्कार

या कार्यक्रमात न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ॲड. कपिल निवडुंगे व ॲड. अस्मिता निवडुंगे या बहिण-भावाचा परिषदेच्या संयोजन समितीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्‍यानंतर भीमशाहीर प्रकाश दांडेकर यांचा प्रबोधनात्मक बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम झाला. धम्म परिषदेत विविध १८ ठराव घेण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com