8 लाखाच्या बिलाने भाजीविक्रेत्याची आत्महत्या; महावितरणचा बिलींग इंचार्ज, क्‍लार्कविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

'मला मीटर रीडिंग व खूप जास्त विजबिल दिले आहे, मी माझे जीवन स्वत: संपवित आहे', अशी चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद - 8 लाख 57 हजारांचे विजबील दिल्यानंतर हादरलेल्या भाजीविक्रेत्याने गुरुवारी (ता. 10) गळफास लावून आत्महत्या केली. अशा अनागोंदी कारभाराचा फटका महावितरणच्या बिलींग इंचार्ज व क्‍लार्कला बसला. भाजी विक्रेत्याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 11) गुन्ह्याची नोंद झाली. 

जगन्नाथ नेहजी शेळके (वय 43, रा. भारतनगर) यांना महावितरणकडून सुमारे 8 लाख 65 हजारांचे विजबील आले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन याबाबत माहिती दिली, परंतू त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अर्धे बील भरा, नंतर बघू असे त्यांना सांगण्यात आले. तसेच त्यांच्या घरी येऊन 5 हजार रुपये बील कमी करण्यासाठी घेऊन गेले असे तक्रारीत मृत जगन्नाथ शेळके यांच्या पत्नी भागीत्राबाई शेळके यांनी नमूद केले. जादा विजबीलाच्या चिंतेतून पती जगन्नाथ शेळके यांनी गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास गादीखालील वीजबील हातात घेतले. त्यानंतर 'मला मीटर रीडिंग व खूप जास्त विजबिल दिले आहे, मी माझे जीवन स्वत: संपवित आहे', अशी चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येस कारणीभूत महावितरणच्या जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून एफआयआर हाती द्यावा.

त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी जगन्नात शेळके यांच्या पत्नी भागीत्राबाई यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानुसार, बिलींग इंचार्ज व बिलींग क्‍लार्कविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. दरम्यान गुरुवारी रखडलेली उत्तरीय तपासणी पुर्ण झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: case file in police station against Billing Incharge and Clark of Mahavitaran