तिचे स्वप्न अपूर्ण राहिले, तरुणीचा आकस्मिक मृत्यू

मनोज साखरे
गुरुवार, 18 जुलै 2019

मैदानावर सराव करताना अचानक भोवळ येऊन ती पडली.
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

औरंगाबाद - पंढरपूर येथील 18 वर्षीय तरुणीला पोलिसांत भरती व्हायचे होते. त्यासाठी बुधवारी (ता. 17) एका खासगी अॅकॅडमीत तिने प्रवेश घेतला. गुरुवारी (ता. 18)
सकाळी तिचा सरावाचा पहिलाच दिवस होता. सकाळी सहा वाजता सिडको महानगर येथील पाण्याच्या टाकीमागील मैदानावर सराव करताना अचानक भोवळ येऊन ती पडली.
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे पोलिस होण्याचे तिचे स्वप्नच राहिले. सीमा भगवान बोकनकर असे मृताचे नाव आहे.

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाने नुकतीच बारावी पास केली होती. गरीब परिस्थिती असल्याने ती पोलिस भरतीचे स्वप्न पाहत होती. ते पूर्ण करण्यासाठी तिने वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेस लक्ष्य करिअर अॅकॅडमीत बुधवारी प्रवेश घेतला होता. गुरुवारी सरावासाठी पहिल्यांदाच ती सिडको महानगर येथील पाण्याच्या टाकीमागील मैदानावर आली. सकाळी सहा वाजता सरावादरम्यान तिला अचानक चक्कर आल्याने ती खाली कोसळली.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला घाटीत हलविण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. सीमा अभ्यासात हुशार होती. दहावीमध्ये तिला 61 टक्के होते, तर नुकतेच बारावीमध्ये तिला 72 टक्केवारी मिळाली होती, असे करिअर अॅकॅडमीचे शिवाजी बनकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Casual death of 18-year-old girl at Aurangabad