
सरकारने हल्ले गांभीर्यपूर्वक घ्यावेत आणि ड्रोन व नाईट व्हिजन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता.२७) मुख्यमंत्री व वनमंत्र्यांना पत्र पाठवून केली.
बीड : जिल्ह्यातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने हल्ले गांभीर्यपूर्वक घ्यावेत आणि ड्रोन व नाईट व्हिजन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता.२७) मुख्यमंत्री व वनमंत्र्यांना पत्र पाठवून केली. दरम्यान, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सुरडी (ता.आष्टी) येथील नागनाथ गर्जे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी याच तालुक्यात किन्ही येथे बिबट्याने हल्ला करून स्वराज भापकर या मुलाला ठार केले. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे व भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी अनुभवी नेमबाजांची नियुक्ती करावी. मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावावेत व दिवसभर ७ ते८ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे तसेच नाईट व्हिजन कॅमेऱ्याव्दारे बिबटयाचा शोध घ्यावा. यासह काही उपायोजना तात्काळ प्रभावीपणे राबविण्यात याव्यात अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली.
संपादन - गणेश पिटेकर