सण, उत्‍सव घरीच साजरे करा : पोलिस अधीक्षक योगेशकुमार 

संजय कापसे/विनायक हेंद्रे
Thursday, 9 April 2020

कोरोना आजाराच्या परिस्थितीमध्ये जमावबंदी असल्या कारणामुळे पुढील काही दिवस कुठल्याही नागरिकांना एकत्रित गर्दी करता येणार नाही, त्याअनुषंगाने आगामी काळात सण, उत्सव घरीच साजरे करावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी केले आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराची पार्श्वभूमी पाहता आगामी काळात येणारे सर्व धार्मिक सण व उत्सव नागरिकांनी एकत्रित न येता आपल्या घरीच साजरे करावेत, त्या दृष्टीने शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक घेत त्यांना माहिती द्यावी, नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी जनजागृती करावी, अशा स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी बुधवारी (ता. आठ) अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेली जमावबंदी व लॉकडाउन दरम्यान नागरिकांनी दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, याकरिता कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत अधिकारी पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसांपासून नागरिकांकडून नियमाचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

हेही वाचावितरणापूर्वी रेशनच्या मालाची तपासणी करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

सोशल डिस्टन्सचे पालन

वेळप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिक व युवकांना जरब दाखविण्याचे कामही पोलिसांनी हाती घेतले आहे. बुधवारी येथे पोलिस अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या जवानांनी एकत्रित येत सोशल डिस्टन्सचे पालन करीत शहरातून पथसंचलन केले. 

धर्मगुरूंची बैठक घेत माहिती द्यावी

हे पथसंचलन बसस्थानक परिसरात असताना पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या वेळेस योगेशकुमार यांनी आजाराच्या परिस्थितीमध्ये जमावबंदी असल्या कारणामुळे पुढील काही दिवस कुठल्याही नागरिकांना एकत्रित गर्दी करता येणार नाही, शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक घेत त्यांना या प्रकाराची माहिती द्यावी.

कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी

 आगामी काळात येणारे सर्व धार्मिक सण व उत्सव नागरिकांनी घरीच साजरे करावेत, कोरोना आजाराची जनजागृती करून नागरिकांना माहिती द्यावी, कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशा सूचनाही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी पोलिस विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

आखाडा बाळापुरात पथसंचलन

आखाडा बाळापूर : येथील पोलिस ठाण्याच्या वतीने बुधवारी (ता. आठ) सायंकाळी शहरातून पथसंचलन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. घरात राहण्याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिकांकडून सूचनांचे पालन केले जात नसल्याने पोलिस यंत्रणादेखील त्रस्त झाली आहे. 

येथे क्लिक करा - बॅंक खात्याची माहिती देताना काळजी घ्या : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन

त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध आता पोलिस विभागाने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुंपडे, जमादार संजय मार्के, गजानन भालेराव, प्रभाकर भोंग यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केले.

शुक्रवारी किराणा दुकान राहणार सुरू

 दरम्यान, शुक्रवारी (ता. दहा) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकान सुरू राहणार आहेत. याशिवाय भाजी विक्रेत्यांसाठीही वेळ खुली करण्यात आली आहे. बाजार समितीच्या मैदानावर भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राहकांनी बाजार समितीच्या मैदानावर जाऊन भाजी खरेदी करावी, असे आवाहान करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate festivals, festivals at home: Superintendent of Police Yogesh Kumar Hingoli news