MONDAY POSITIVE : शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस धूमधडाक्‍यात

सयाजी शेळके
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

  • तरंगे कुटुंबीयांच्या उपक्रमाने यशोदा तरंगे सद्‌गदित
  • नातवंडांच्या प्रेम, आदराने आजी भारवल्या 

उस्मानाबाद - लहान मुलांचे, नेतेमंडळींचे वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरे झाल्याचे आपण नेहमी पाहतो. पण 101 वर्षांच्या आजींचा वाढदिवस साजरा केला, हे पाहिलेय का? जिल्ह्यातील ताकविकी येथे नातवंडांनी आपल्या आजीचा वाढदिवस धूमधडाक्‍यात साजरा केला. वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंब तर एकत्र आलंच, शिवाय परिसरातील नागरिकसुद्धा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहाने सहभागी झाल्याने या आनंदाने यशोदा कोंडीबा तरंगे या आजी भारावून गेल्या.

आजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तरंगे कुटुंबीयांनी दारात भव्य मंडप टाकला. केक कापण्यासाठी आकर्षक सजावटही केली होती. यशोदाआजींना चार मुले व एक मुलगी आहे. वाढदिवसानिमित्त चार मुले, मुलगी, दोन भाऊ, सुना, 18 नातवंडे, 27 पतवंडे यांच्यासह जावई व नातजावई उपस्थित होते. यशोदा यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. यंदा ऐन दिवाळी सणातच आजीचा वाढदिवस आल्याने उत्साहात भर पडली. नातजावई असल्याने मोहोळ (जि. सोलापूर) येथील उद्योजक चंद्रकांत वाघमोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यशोदा यांचा जन्म 1918 मध्ये तोरंबा (जि. उस्मानाबाद) येथे झाला. शहाजी तरंगे, माणिक तरंगे, श्रीधर तरंगे, बजरंग तरंगे ही त्यांची मुले. गोदाबाई ही त्यांची एकुलती एक लेक. त्यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. नातवंडे अण्णासाहेब तरंगे, विठ्ठल तरंगे, पांडू तरंगे, शिवाजी तरंगे, ज्ञानेश्वर तरंगे, विश्वास तरंगे यांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. 

हेही वाचा

सदस्याने कुजलेली पिके आणली अधिसभेत!

...म्हणून जास्तीच्या निविदेतून उभारणार शिवरायांचा पुतळा

सकाळपासून घरात एवढी गर्दी पाहून मला काही समजत नव्हते. आज सगळेच कसे काय एकत्र आलेत, हे कळेनाच. माझ्या नातींनी नवी साडी नेसवली आणि सांगितलं, आजी तुझा आज वाढदिवस साजरा करायचा आहे. मला काय कळेनाच? खूप कष्टांतून संसार केला, आज सगळे सुखात आहेत, हे पाहून समाधान वाटले. 
- यशोदा कोंडीबा तरंगे, ताकविकी

आजीचा वाढदिवस साजरा करताना घरातील सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आमची आजी 101 व्या वर्षीही ठणठणीत आहे, याचे आम्हाला निश्‍चितच खूप समाधान आहे. आम्ही सर्व भावांनी विचार करून वाढदिवस साजरा करायचे ठरवले. त्यामुळे सर्व नातेवाईक एकत्र आले आहेत. 
- विठ्ठल तरंगे, ताकविकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate grandma's birthday