भरदिवसा अवतरले सोनसाखळीचोर ! 

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - पोलिस असल्याचा आव आणत तीन महिलांना घाबरवून दोघा दुचाकीस्वार भामट्यांनी एकाच दिवसात तीन महिलांचे मंगळसूत्र लांबविले. शहरात भरदिवसा तासाभराच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना गंडविताना सिडको एन-पाच येथील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले. 
 
पहिली घटना 
सिडको भागातील सत्यमनगरातील कमलबाई पाटेकर (वय 55) या शनिवारी (ता. दोन) सकाळी झाडांना पाणी देत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एक हेल्मेटधारी पाटेकर यांच्याजवळ गेला. त्याने कमलबाईंचे लक्ष विचलित करून हेल्मेट काढण्याचे नाटक केले. त्यावेळी एका हाताने कमलबाईंच्या तोंडावर जोराने फटका लगावला. तसेच नाक व तोंड दाबून दुसऱ्या हाताने त्याने सोन्याचे गंठण हिसकावण्यासाठी हात पुढे केला. कमलबाईंनी गंठण घट्ट पकडल्याने चोरट्याने त्यांना जमिनीवर ढकलले. लागलीच चाकू काढत धाक दाखवला. संधी मिळताच कमलबाईंनी आरडाओरड केली. आवाजामुळे पतीसह परिसरातील रहिवासी धावले. रहिवाशांना पाहून चोराने गंठणाला हिसका देत साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून पळ काढला. जळगाव रोडच्या दिशेने गेलेल्या चोराच्या हाती गंठणाचा तिसरा हिस्सा लागल्याचे सिडको पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 
 

दुसरी घटना 
हनुमाननगरात द्वारकाबाई विनायक जाधव (वय 54) सकाळी साडेअकराच्या सुमारास बॅंकेत पेन्शन आणण्यासाठी गेल्या होत्या. बॅंकेतून पेन्शनचे 20 हजार रुपये रुमालात गुंडाळून पायी जात असताना हनुमाननगरातील गल्लीत त्यांच्या पाठीमागून हेल्मेटधारी दुचाकीस्वार आले. त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगितले. थापा मारून त्यांना गळ्यातील सोनसाखळी काढून ठेवा, असे चोरट्यांनी धमकावले. विश्‍वास बसल्याने द्वारकाबाईंनी लगेचच सोनसाखळी काढली. तेव्हा त्याने सोनसाखळी हातात घेत रुमालात गुंडाळून ठेवल्याचे भासवले व सव्वा तोळ्याची सोनसाखळी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर द्वारकाबाईंनी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. 
 

तिसरी घटना 
मनीषा अनिल देशमुख (वय 43, रा. उल्कानगरी) या दुपारी पावणेबाराच्या सुमारास मुकुंदवाडी बसस्टॉपजवळील एका हॉटेलसमोर उभ्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवर आलेल्या दोन हेल्मेटधारींनी "मावशी पुढे नाकाबंदी सुरू आहे, आम्ही पोलिस आहोत, तुमच्या गळ्यातील सोनसाखळी काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा,' असे म्हणाले. त्यामुळे मनीषाबाईंनी सहा ग्रॅमची सोनसाखळी काढली. तेव्हा चोराने सोनसाखळी स्वत:च्या हातात घेऊन पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करत हातचलाखीने लांबविली. चोरटे दुचाकीवरून पसार झाल्यानंतर त्यांना सोनसाखळी दिसून आली नाही. त्यामुळे जवळच असलेल्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com