हिंगोलीत पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस

photo
photo

हिंगोली:  जिल्‍ह्यात पाच पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीची सोमवारी (ता.३०) निवड होणार आहे. त्‍यासाठी सदस्यांवर वॉच ठेवला जात असून कोणाला सभापतिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सेनगाव व औंढा पंचायत समिती सभापती निवड चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. 

मार्च २०१७ मध्ये निवडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींची मुदत सप्टेंबर महिण्यात संपली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे डिसेंबर (ता.२०)पर्यंत मुदतवाढ मिळाली. त्‍यांनतर शनिवारी (ता.२१) जिल्‍हा प्रशासनाने सभपती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सभापती, उपसभापती पदाची निवड सोमवारी (ता.३०) होणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील पीठासन अधिकारी म्‍हणून तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. 

हिंगोलीत संजिवनी दीपके, सुमनबाई झुळझुळेत चुरस

हिंगोली पंचायत समितीचे सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या पंचायत समितीत वीस सदस्य आहेत. पक्षीय बलाबलमध्ये शिवसेना आठ, काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस एक, भाजप तीन तर दोन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. विद्यमान सभापतिपद शिवसेनेकडे असून उत्तमराव असोले हे सभापती आहेत. सध्या शिवसेनेकडे दोन दावेदार आहेत. यात राहुली गणाच्या संजिवनी दीपके व जामठी गणाच्या सुमनबाई झुळझुळे यांचा समावेश आहे. इतर पक्षांकडे एकही महिला दावेदार नसल्याने या दोन्हीपैकी एकाला सभापतिपद मिळणार आहे. 

वसमतला भाजपकडे राहणार सभापतिपद

वसमत पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे चोवीस सदस्य आहेत. पक्षीय बलाबलमध्ये शिवसेना अकरा, काँग्रेस तीन, राष्ट्रवादी दोन तर भाजपचे दोन सदस्य आहेत. आरक्षणाप्रमाणे पांगरा शिंदे, हट्टा, खांडेगाव गणातून भाजपचे तीन सदस्य निवडून आले आहेत. खांडेगाव गणातून गोविंदराव सुपेकर, पांगरा गणातून ज्‍योती धोसे; तर हट्टा गणातून निता वैद्य यांचा समावेश आहे. येथे राष्‍ट्रवादी व शिवसेनेची आघाडी झाल्यास संख्याबळ अकरा होणार आहे. परंतु, त्‍यांना दोन सदस्य कमी पडत आहेत.   

कळमनुरीत सख्या मावस बहिणींमध्ये चुरस

कळमनुरी पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. येथे बावीस सदस्य आहेत. यात काँग्रेस तेरा, शिवसेना सहा व तीन अपक्षांचा समावेश आहे. काँग्रेसकडे स्‍पष्ट बहुमत आहे. येथे आशाताई धुमाळे व पंचफुला बेले यांच्यात स्‍पर्धा आहे. विद्यमान सभापती काँग्रेसच्या विजयमाला पंतगे आहेत. आता आरक्षणानुसार कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सेनगावात सभापतिपद कोणाला मिळणार ? याकडे लक्ष 

सेनगाव पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून येथे वीस सदस्य आहेत. पक्षीय बलाबलमध्ये काँग्रस सहा, शिवसेना पाच, राष्ट्रवादी चार, भाजप चार तर एका अपक्षाचा यात समावेश आहे. शिवसेना व राष्‍ट्रवादी एकत्र येत सभापतिपद मिळविले होते. आता आरक्षणाप्रमाणे राष्‍ट्रवादीला सभापतिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेकडेच राहणार सभापतिपद

औंढा पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथे अठरा सदस्य आहेत. यात शिवसेना अकरा, काँग्रेस तीन, राष्ट्रवादी दोन; तर भाजपचे दोन सदस्य आहेत. यापूर्वी येथे अनुसूचित जातीसाठी सभापतिपद राखीव होते. शिवसेनेचे भीमराव भगत हे सभापती आहेत. आता आरक्षणाप्रमाणे येथे शिवसेनेकडे स्‍पष्‍ट बहुमत असल्याने शिवसेनेकडेच सभापती पद राहणार आहे. यात शिरडशहापूर, सेंदुरसना, पुरजळ, उखळी, असोला या गणातील सदस्यांचा समावेश आहे. पाच सदस्यांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com