येथील विद्यार्थी घेतात झोपडीत शिक्षण

photo
photo

सेनगाव(जि. हिंगोली) : बालकांचा शैक्षणिक अधिकार कायद्यांतर्गत शाळेत इमारत, पाणी, स्वच्छतागृह यासह विविध दहा मानांकन ठरवून दिले आहेत. मात्र, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे याला अपवाद तालुक्यातील घोरदरी येथील मुंगसाजीनगरची जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. येथील शाळेतील विद्यार्थ्यांना इमारतच नसल्‍याने विद्यार्थी चक्क कुडाच्या झोपडीत शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

तालुक्यातील घोरदरी गावापासून एक किलोमीटर अंतरावर मुंगसाजी नगर आहे. तेथे आदिवासी समाजाची वस्ती आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वस्तीशाळा होती. २०१४ मध्ये वस्तीशाळाचे समायोजन जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले. सुरवातीला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास फुपाटे यांनी दीड वर्ष शाळेसाठी मोफत खोलीची सोय केली. ती जागा अपुरी पडत असल्याने इतरत्र शाळा भरविण्यासाठी प्रयत्न झाले. परिसरात आदिवासी समाजाचे शेतकरी आहेत, त्यांची जमीन संपादित करता येत नाही. 

ग्रामस्थांनी केला प्रशासनाकडे पाठपुरावा

त्यामुळे वन विभागाच्या जागेत असलेल्या माळरानावर शाळा भरविण्यात आली. येथे इमारत व्यवस्था व्हावी म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, वन विभागाची जागा मिळविण्यासाठी मंत्रालयातून वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी वनहक्क समिती तयार करून प्रस्ताव दाखल करणे गरजेचे आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांनी माघार घेतली.

तीन वर्षांपासून झोपडीत भरतात वर्ग  

शाळा भरणे अनिवार्य असल्यामुळे गावकरी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी कुडाच्या झोपड्या तयार केल्या. तेथे मागील तीन ते चार वर्षांपासून शाळा भरते. मुंगसाजीनगर येथील शाळेत एक किमी अंतरावर असलेल्या साबळेवाडीचे विद्यार्थी दररोज पायी येतात. सध्या येथे पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गात सतरा विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे. दोन शिक्षक नियमित शिकवणी करतात. येथील विद्यार्थ्यांचे पालक शेती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. आर्थिक स्थितीने गरीब असले तरी अत्यंत प्रामाणिक पालक आहेत. या शाळेत दोन झोपड्या असून ऊन, वारा, पाऊस याचा वर्षभर विद्यार्थी व शिक्षकांना सामना करावा लागतो. बसण्यासाठी बेंच व फळा हेच साहित्य आहे.

शाळेत मानांकनाचा अभाव

आरटीई बालकांचा शिक्षण कायद्यांतर्गत शाळेत इमारत, मैदान, पाणी, स्वच्छतागृह, अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, डिजिटल बोर्ड यासह विविध दहा मानांकन ठरवून देण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, तालुक्यातील मुंगसाजी नगर येथील जिल्हा परिषद शाळेत या मानांकनाचा अभाव असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ज्ञानासाठी मोठा संघर्ष

शासनाकडून बालक कोणत्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जातात. सहा ते ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण बालकांचा मूलभूत अधिकाराचा समावेश केला. विद्यार्थ्यांना शाळेत टिकविणे, त्यास गुणवत्तापूर्ण, आनंददायी, शिक्षण देणे यासह विविध महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आली. मात्र, वर्गखोली, पाणी, स्वच्छतागृह, मैदान या मूलभूत सोयी सुविधांअभावी मुंगसाजी नगर येथील विद्यार्थी ज्ञानासाठी मोठा संघर्ष करत आहे.

लोकवर्गणीतून २४ हजार रुपये जमविले

येथील ग्रामस्थ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी पत्राचे शेड उभारण्यासाठी लोकवर्गणीतून २४ हजार रुपये जमविले. त्यातून लोखंडी एंगल व काही पत्रे लिहून शेड उभारले आहे. त्याचेही काम पूर्ण होण्यासाठी पैशाची कमतरता पडल्यामुळे अर्धवट काम झाले आहे.

डिजिटल शाळाचे स्वप्न राहिले अपूर्ण

शिक्षण विभागाकडून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळा डिजिटल बनविण्यासाठी विशेष प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, मुंगसाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेला वर्गखोल्यांसह पायाभूत सुविधाच नाहीत, तर येथील शाळेचे डिजिटल स्वप्न पूर्ण होणार कधी? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

विविध संकटांला तोंड देताहेत विद्यार्थी 

तालुक्यातील घोरदरीजवळ असलेल्या मुंगसाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या व पायाभूत सुविधा नाहीत. त्या उपलब्धतेसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क कुडाच्या झोपडीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. हा प्रकार निश्चितच गंभीर आहे. ऊन, वारा, पाऊस यासह विविध संकटांला विद्यार्थी व शिक्षक तोंड देत आहेत. 
- संजय चिलगर, ग्रामस्‍थ, घोरदरी.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com