चंद्रकांत पाटील यांच्या निम्या शुल्कात प्रवेश देण्याच्या सूचना हवेतच !

राजेभाऊ मोगल
बुधवार, 20 जून 2018

... तर रोखता न येणारे आंदोलन करू 
सरकारला धडकी भरावी असे मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. असे असतानाही सरकार समाजाची दिशाभुलच करीत आहे. मंत्री पाटील यांनी केलेल्या घोषणांबाबत तातडीने महाविद्यालयांना कळवावे. जर आता फसवणूक झाली तर रोखता न येणारे आंदोलन उभे करू, असा इशारा क्रांती मोर्चातर्फे यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात आल्याचे सांगत निम्मे शुल्क सरकार भरेल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, अद्यापही तशा सूचना न आल्याचा मुद्दा उपस्थित करीत मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (ता. 19) सरकारचा निषेध करण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चामुळे सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री पाटील यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच ही सवलत न देणाऱ्यांवर कारवाई होईल, असा दमदेखील त्यांनी दिला होता. दरम्यान, या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून मराठा संघटनांनी शहरातील अनेक महाविद्यालयात या निर्णयासंदर्भातील काही पत्र आले आहे का, अशी विचारणा केली. मात्र, तशा काहीही सूचना नसल्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले. प्रवेशप्रक्रीया सुरु झालेली असतानाही अद्याप पत्र न आल्याने मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा समाजाला गाजर दाखविल्याचा आरोप विविध मराठा संघटनांनी केला. संतापलेल्या विविध संघटनांनी एकत्र मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मंत्री पाटील यांच्या विरोधात घोषणात देत निषेध व्यक्‍त केला. 

आंदोलनात रमेश केरे पाटील, संजय सांवत, शैलेश भिसे, माणिकराव शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल बनसोड, शिंदे पाटील, चंद्रकांत भराड, मच्छिंद्र देवाकर, गणेश थोरात, विजय घोगरे, निलेश धस, लहु राठोड, सोमनाथ पवार, गोरख गिरी, शुभम केरे, विवेक वाकोडे, संतोष गायकवाड, परमेश्वर नलावडे, गावंडे पाटील आदी समाज बांधव सहभागी होते. 

... तर रोखता न येणारे आंदोलन करू 
सरकारला धडकी भरावी असे मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. असे असतानाही सरकार समाजाची दिशाभुलच करीत आहे. मंत्री पाटील यांनी केलेल्या घोषणांबाबत तातडीने महाविद्यालयांना कळवावे. जर आता फसवणूक झाली तर रोखता न येणारे आंदोलन उभे करू, असा इशारा क्रांती मोर्चातर्फे यावेळी देण्यात आला.

Web Title: Chandrakant Patil promise of Maratha Community for education