मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत हवेत हे बदल

सुशांत सांगवे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मृत्यूच्या कारणांपैकी मधुमेह हे सातवे प्रमुख कारण असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. जगभरात सध्या 42 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

लातूर: मृत्यूच्या कारणांपैकी मधुमेह हे सातवे प्रमुख कारण असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. जगभरात सध्या 42 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा धोका रोखण्यासाठी आणि या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी आपली जीवनशैली बदलावी. संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

मधुमेह हा बहुतेकदा रक्तातील वाढलेल्या साखरेचा आजार मानला जातो. हे जरी सत्य असले, तरीही रक्तातील साखर अनियंत्रित वाढल्यास त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाबरोबरच इतर आजार टाळण्यासाठी योग्य जीवनशैली प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. हाच धागा पकडत डॉ. अभिजित मुगलीकर (श्री समर्थ डायबिटिज सेंटर) म्हणाले, की मधुमेह टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळ्यांवर कसा परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत असणे आवश्‍यक आहे.

तणाव आणि खाण्याच्या सवयीचा जीवनशैलीवर प्रचंड प्रभाव पडतो आणि म्हणूनच आपण जी अनारोग्यपूर्ण जीवनशैली जगत आहोत. त्यामुळे जीवनशैलीशी निगडित असंख्य आजार आपल्यावर आक्रमण करीत असतात. स्वतःची योग्य देखभाल करणे आणि योग्यवेळी उपचार घेणे गरजेचे आहे. मधुमेहाची योग्य देखभाल न केल्यास त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. 

डॉ. वृंदा कुलकर्णी-कानडे (अक्षय हॉस्पिटल) म्हणाल्या, तब्येतीची नीट काळजी न घेतल्यास, आनुवंशिक आणि गरोदरपणातील मधुमेह असे मधुमेहाचे तीन प्रकार आहेत. जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, वारंवार लघवी होणे, विनाकारण वजन घटणे, थकवा अथवा चक्कर येणे, जखमा सावकाश भरणे, दृष्टी कमी होणे, हातापायांना मुंग्या येणे किंवा बधिरता येणे अशी लक्षणे आढळून येत असतील तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आनुवंशिक मधुमेह असल्यास वयाच्या चाळिशीनंतर किंवा कोणतेही लक्षण दिसून आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. टीव्ही, मोबाईल, संगणकाचा अतिरेक टाळावा. गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यांत व सहाव्या महिन्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे. संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा. 

हे करा... 
- नियमित व्यायाम, योगासने करा 
- जेवणाच्या वेळा नियमित हव्यात 
- हिरव्या पालेभाज्या, सॅलाड, ताजे फळं खावीत, ताक प्यावे 
- आहारात शर्करायुक्त, चरबीयुक्त पदार्थांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे 
- झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तासआधी जेवण घ्या 
- दोनवेळा भरपेट जेवण्यापेक्षा 3-4 तासांनी थोडा-थोडा आहार घ्या 

हे टाळा... 

- सायीसकट दूध, लोणी, तेलकट पदार्थ 

- चीज, क्रीम, सॉस, आईस्क्रीम, चॉकलेट 
- वनस्पती तूप, मैद्याचे आणि बेकरीचे सर्व पदार्थ 
- रताळे, बटाटा, साबुदाणा, बासमती, स्वीट कॉर्न, थंड पेय 
- धूम्रपान, दारू, जागरण 
- हरभरा, वाटाणा, छोलेराजमा आणि तिखट, खारट, मसालेदार  अन्न 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: change your lifestyle latur