esakal | मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा हल्लाबोल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : मी राजकारण सोडले, घरात बसले असा अपप्रचार झाला; मात्र मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा हल्लाबोल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.

मुंडे-धस आमने सामने! मिटणाऱ्या ऊस संपातून नव्या पक्षांतर्गत युद्धाचा जन्म!   


राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे रविवारी (ता.२५) झालेल्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे, राहुल केंद्रे आदी उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करत, ऊसतोडणी मजुरांच्या संपावरून पक्षांतर्गत विरोधकांवरही हल्ला चढविला. मुंडे म्हणाल्या, नुकसानभरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत व अभिनंदन. मात्र, हे पॅकेज पुरेसे नाही, मायबाप सरकारने उदारता दाखवावी, अन्यथा रस्त्यावर उतरू.

सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची दानत मुंडे कन्येत आहे.
माझ्या पराभवानंतर लोक आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना, शल्य आहे. मात्र लोकनेते गोपीनाथ मुंडे जाण्याइतका तर पराभव वाईट नाही ना, अशा शब्दांत मी कार्यकर्त्यांची समजूत काढते. आपला पराभव करता येत नसल्याने आपल्यात विसंवाद घडवून पराभवाचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे वज्रमूठ आवळा, मागे वळून पाहणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका


भाजपने राष्ट्रीय सचिवपद दिले, ही एक संधी आहे. मात्र मी बीडची भूमिपुत्र असून हीच माझी कर्मभूमी आहे. मी महाराष्ट्रात लक्ष घालणार आहे. पूर्वी निधीचा पाऊस पाडला, आता रस्त्यावर उतरून जाब विचारू असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाचाही पुनरुच्चार केला. ठाकरे अधिकाराने रागावल्याने मजुरांसाठी सांगलीला निघालेले असताना थांबले, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण - धर्मकारण एकत्र आल्याशिवाय समाजाचे उत्थान नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण असल्याचेही त्या म्हणाल्या.

ऊसतोड मजूर संपावरूनही हल्लाबोल
ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला? मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढेही करू. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. लाचारी नको, स्वाभिमान म्हणून ऊसतोडणीस जा, असे मी मजुरांना सांगितले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करून काय झाले, असा सवालही त्यांनी नाव न घेता पक्षविरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना यूपीत पाठवू, असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्या २७ तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवीन, असा इशाराही दिला.

बघू, जे व्हायचे ते...
दरम्यान, मेळाव्यात भाषणावेळी पंकजा मुंडे यांनी मास्क काढला. आता बघू जे काय व्हायचे ते, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहेच, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

म्हणून डॉ.मुंडे अनुपस्थित
कोरोनासदृश लक्षणांमुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे मेळाव्याला अनुपस्थित होत्या. आरोग्य तपासणी केली असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे डॉ. मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसा उल्लेख पंकजा मुंडे यांनीही केला.

संपादन - गणेश पिटेकर