औरंगाबादेत संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

संभाजीराजे सर्वपक्षीय जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेतर्फे सिडकोतील छत्रपती महाविद्यालय ते टी.व्ही. सेंटर येथील संभाजी महाराज चौक येथे दुचाकी, चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली.

औरंगाबाद - छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. 14) सकाळपासूनच टी. व्ही. सेंटर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शंभुभक्‍तांनी गर्दी केली आहे. यानिमित्ताने शहराच्या विविध भागात शोभायात्रा, वाहनरॅलीसह विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. 

बुलंद छावा मराठा युवा परिषदेतर्फे टी. व्ही. सेंटर परिसरातील विभागीय कार्यालयापासून सकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्‌घाटन आमदार सतीश चव्हाण, उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन शेळके, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजी महाराज चौकात या मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 

संभाजीराजे सर्वपक्षीय जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेतर्फे सिडकोतील छत्रपती महाविद्यालय ते टी.व्ही. सेंटर येथील संभाजी महाराज चौक येथे दुचाकी, चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली. त्यानंतर अभिवादन कार्यक्रम, शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा धर्मवीर संभाजीराजे पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सायंकाळी 501 मुला-मुलींना हुंडा घेणार नाही, देणार अशी शपथ दिली जाईल. त्यानंतर शेतकरी आत्महत्या, हुंडाबंदी यावर आधारित पथनाट्य, पोवाडा सादर केला जाणार आहे. गरीब मुला-मुलींना गरजू वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. या वेळी उत्सव समितीचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, मार्गदर्शक अंकुशराव कदम, स्वागताध्यक्ष नितीन घोगरे, कार्याध्यक्ष आनंद पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, विवेक वाकोडे, सरचिटणीस शुभम केरे, उबाळे, राहुल मुगदल यांची उपस्थिती राहील. 

दरम्यान, मुकुंदवाडी येथे संभाजीराजे सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे सायंकाळी सहाला अमोल मिटकरी यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमास किशोर शितोळे, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सुनील कोटकर, मोतीलाल जगताप, ऍड. चंद्रकांत ठोंबरे दामुअण्णा शिंदे, रमेश गायकवाड यांची उपस्थिती राहील.

Web Title: Chatrapati Sambhaji Maharaj jayanti celebrated in Aurangabad