दानवेंच्या नावाने नागरिकांना गंडवणारा संशयित अटकेत

दानवेंच्या नावाने नागरिकांना गंडवणारा संशयित अटकेत

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत नोकरी, बढती, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीनजणांनी पंधरापेक्षा अधिक व्यक्तींना गंडवल्याचा प्रकार समोर आला. यांत एका संशयित भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. ही फसवणूक कोटींमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी (ता. 19) सांगितली.

गणेश रावसाहेब बोरसे (वय-46, मूळ रा. करजगाव, ता. भोकरदन, जि. जालना, ह. मु. अंजली अपार्टमेंट, खडकेश्वर, औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. परभणी तालुक्‍यातील रामकृष्णनगरात राहणारे प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर यांनी तक्रारीत नमूद केले, की त्यांचे परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालय व वाकोडकर मल्टी सर्व्हिसेस आहे. वाकोडकर मल्टी सर्व्हिसेसची भविष्य निर्वाह निधीसंदर्भात औरंगाबाद येथे गतवर्षापासून सुनावणी सुरू आहे. त्यामुळे प्रमोद हे या सुनावणीसाठी औरंगाबाद शहरात येत-जात होते. नऊ मार्चला ते सुनावणीला शहरात आले असता दुपारी दीडच्या सुमारास बोरसे तेथे भेटला. त्याने प्रमोद यांना तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कार्यालयात फेऱ्या मारत असल्याबद्दल विचारपूस केली. त्या वेळी प्रमोद यांनी कंपनीच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील अडचणी सांगितल्या व "तुम्ही येथे नोकरीस आहात का,' अशी गणेश बोरसेला विचारणा केली. त्यावर गणेशने "रावसाहेब दानवे यांच्या गावाचा' असल्याचे सांगितले. तसेच दानवे हे मंत्री असताना अशा प्रकारची बरीच कामे केल्याचे त्याने प्रमोद यांना सांगून, तुमचे सुनावणीचे काम तत्काळ करून देतो, अशी थाप मारत या कामासाठी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केली.

दोघांमध्ये तडजोड होऊन कामाचे एक लाख रुपये देण्याचे ठरले. प्रमोद यांनी 16 एप्रिलला संशयित बोरसेला औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे बोलावत पैसे दिले. त्यानंतर प्रमोद यांनी सुनावणीबाबत बोरसेला वारंवार विचारणा केली. पण, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बोरसेविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

25 मेपर्यंत पोलिस कोठडी
कंपनी चालकाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेतील गणेश बोरसे याला मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक तक्रारी
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मुंबईत बोरसेने अनेक अधिकाऱ्यांना मी दानवे यांचा भाऊ आहे, तुमच्या बदल्या करून देतो, असे सांगून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले होते. बोरसे याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याच्या तक्रारी विविध ठिकाणी पोलिसांकडे प्राप्त झाल्यात.

कोण आहे गणेश बोरसे ?
गणेश बोरसे हा मूळचा भोकरदन तालुक्‍यातील करजगाव येथील रहिवासी आहे. दहा वर्षांपूर्वी त्याला औरंगाबादच्या आरे डेअरीतील बनावट दूधप्रकरणात अटक झाली होती. जामिनावर सुटल्यावर बोरसे याचे फसवणुकीचे प्रकार सुरूच होते. मारुती नावाने बनावट खत कंपनी उघडून अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्या वेळी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद झाली.

बनावट नोटांतही सहभाग
2006-07 मध्ये भोकरदन शहरात बनावट पाचशेच्या नोटांचे रॅकेट उघड झाले होते. यात बोरसेचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, पैशाच्या जोरावर त्याने राजकीय नेत्यांशी जवळीक साधली होती.

नेत्यांसाठी जाहिरातबाजी
भोकरदनचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याशी त्याची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा उचलत त्याने एमएससीबीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगत अनेकांकडून लाखो रुपये उकळले होते. 2012 मध्ये राष्ट्रवादीचे एक नेते भोकरदन येथे आले. त्या वेळी बोरसेने त्यांच्या स्वागताचे पोस्टर आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दानवेंशी जवळीक करण्याचा प्रयत्न
रावसाहेब दानवे यांची केंद्रात राज्यमंत्री म्हणून निवड होताच बोरसे याने भाजपशी जवळीक साधण्यास सुरवात केली. मोठ्या जाहिराती आणि शहरात पोस्टर लावून बोरसेने दानवे यांच्याशी किती घनिष्ठता आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ही सलगी दाखवूनच तो लोकांना गंडवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तीनवेळी जेलची वारी
औरंगाबाद येथील आरे दूध डेअरीतील बनावट दूधप्रकरण, मारुती कंपनीचे बनावट खत विक्री करून केलेली फसवणूक व भोकरदन येथे उघडकीस आलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटा प्रकरणात गणेश बोरसे याची जेलवारीसद्धा झाली होती, अशी माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com