‘नीतिधुरंधर’च्या निमित्ताने जागविल्या बाळासाहेब पवार यांच्या आठवणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद - व्यासंग, स्पष्टवक्तेपणा, गुणग्राहकता, मुद्देसूदपणा आदी गुणवैशिष्ट्यांनी राजकारणात मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या सहकारमहर्षी, लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या आठवणी राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवरांनी शुक्रवारी (ता. २१) येथे जागविल्या. कारण होते ‘नीतिधुरंधर ः बाळासाहेब पवार’ या त्यांच्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचे.

औरंगाबाद - व्यासंग, स्पष्टवक्तेपणा, गुणग्राहकता, मुद्देसूदपणा आदी गुणवैशिष्ट्यांनी राजकारणात मोठा दबदबा निर्माण करणाऱ्या सहकारमहर्षी, लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या आठवणी राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवरांनी शुक्रवारी (ता. २१) येथे जागविल्या. कारण होते ‘नीतिधुरंधर ः बाळासाहेब पवार’ या त्यांच्यावरील चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचे.

संत तुकाराम महाराज नाट्यगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला. ‘ज्या आश्‍वासनापोटी मतदारांनी निवडून दिले, तेच जर पूर्ण होत नसेल तर मी आमदार राहून काय फायदा, असा सवाल करीत तडकाफडकी राजीनामा देणारे बाळासाहेब पवार हे शिक्षण, सहकारवृत्ती होते. राजीनामा देतो म्हणाले आणि दिला. त्यानंतर तुमची मागणी पूर्ण करू असे सांगण्यात आले. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो विषयच नव्हता. ही बाब कळताच मंत्रिमंडळाची बैठकच होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ते जसे बोलायचे तसेच करून दाखवायचे. हे ठाऊक असल्याने त्यांची मागणी पूर्ण करावी लागली. त्यांनी मुख्यमंत्री बदलले असे मी म्हणणार नाही, तर त्यांनी आपल्या विचारांचे वाटणारे व्यक्‍ती मुख्यमंत्री केले. त्यांच्या कामाचा भाव हा व्रतस्थ होता’ असे फडणवीस म्हणाले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी व काही किस्से सांगितले. ग्रंथाचे लेखक महावीर जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. मानसिंह पवार, मंगलसिंह पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कोण काय म्हणाले?

सुरेश प्रभू  (केंद्रीय वाणिज्य मंत्री) - आता नेत्यांचे पद सांगावे लागते. त्या काळात केवळ बाळासाहेब पवार म्हटले तरी त्यांचे कार्यच डोळ्यासमोर उभे राहायचे. 

हरिभाऊ बागडे  (विधानसभेचे अध्यक्ष) - बाळासाहेबांचे कार्य जवळून पाहिले आहे. त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत. आपल्या मतावर ते नेहमी ठाम असत. 

राधाकृष्ण विखे पाटील (विधानसभेतील विरोधी पक्षनेते) - बाळासाहेबांना कुणीही गॉडफादर नव्हता. तरीही त्यांनी अनेकांचे नेतृत्व उभे करून देत गॉडफादर असल्याचे दाखवून दिले.

जयंत पाटील  (माजी अर्थमंत्री) - मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा आग्रह धरत त्यांनी तो सत्यात उतरवून दाखविला. संघर्ष करण्याची वृत्ती असायला हवी, असे ते कार्यकर्त्यांना सांगत असत.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis at the hands of this release ceremony