आईच्या आक्रोशानंतरही झाली नाही मदत; मृतदेहाला लागल्या मुंग्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

एचआयव्ही पीडित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला शेजाऱ्यांनी नकार दिला. हा प्रकार रविवारी (ता. 11) बीड शहरात घडला. अखेर या मुलावर परिसरातील पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीड - एचआयव्ही पीडित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला शेजाऱ्यांनी नकार दिला. हा प्रकार रविवारी (ता. 11) शहरात घडला. अखेर या मुलावर परिसरातील पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे मृतदेहाला मुंगळे लागले होते. 

शहरातील एका 42 वर्षीय महिलेचा तिच्या 25 व्या वर्षी एका मुकादमासोबत विवाह झाला. काही दिवसांनी पतीने तिला सोडून दिले. हॉटेल किंवा इतर ठिकाणी कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेला एचआयव्ही आजाराची लागण झाली. दरम्यान, तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मात्र, दोघांनाही या आजाराची लागण झाली. वर्षभरापूर्वी तिच्या मुलीचा मृत्यू झाला. सध्या मुलगा आणि सदर महिला दोघेच होते. मागच्या 15 दिवसांपूर्वी मुलाची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुधारणा होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला घरी नेले. रविवारी पहाटे त्या मुलाचा मृत्यू झाला. 

मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी महिलेने परिसरातील नागरिकांना विनवण्या करूनही कोणी पुढे आले नाही. अखेर, तिने रिक्षा करून मृतदेह पाली येथील इन्फंट इंडिया संस्थेत नेला. इन्फंटच्या "वेदना' स्मशानभूमीत त्याच्यावर संस्थेचे दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी अंत्यसंस्कार केले. 

सदर महिलेला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळाल्यानंतर तिला आई आणि भावानेही दूर केले. बेघर महिला मजुरी करून उदरनिर्वाह भागवत आहे. आजार असल्याने परिसरातील लोकांकडून त्रास देण्याचे प्रकार नेहमीचेच असून अनेक वेळा तिच्या घरावर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A child suffering from HIV Rejection at the funeral