चार तासांत सातशे टन मिरचीचा नित्य व्यवहार 

प्रकाश ढमाले
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारातील चित्र : देशभरात जातोय माल 

 पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  मिरचीचे माहेरघर म्हणून सध्या भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नावारूपाला आले आहे. येथील बाजार समीतीच्या तीन एकर क्षेत्रावर दररोज दुपारी तीन वाजेपासून भरणाऱ्या या बाजारात चार तासांत सातशे टन मिरचीचा व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे येथून दुबई, श्रीलंका, बांगलादेशसह देशभरातून कोट्यवधींची मिरची जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसह, बेरोजगारांनाही चांगला आर्थिक सहारा झाला आहे. 

पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय नगदी पैशाचे पीक म्हणून गेल्या आठ वर्षांपासून शेतकऱ्यांनी या भागात मिरची पीक घेण्यास सुरवात केली. याचे रूपांतर आता खूप व्यापक झाले आहे. येथून सुरवातीला केवळ वाशी-नवी मुंबई येथे मिरची जाऊ लागली होती. मात्र, आता वाशीप्रमाणेच दिल्ली, लखनौ, आग्रा, गोरखपूर, आझमगढ, जबलपूर, तापी, अहमदाबाद, कोलकाता, कानपूर, कन्याकुमारी; तसेच जम्मू व काश्‍मीर, छत्तीसगड, मध्यप्रदेशातही मिरची जात आहे. शिवाय दुबई, बांगला देश, श्रीलंका अशा परदेशांतूनही येथील मिरचीला मागणी आहे. परिसरासोबतच सिल्लोड, जळगाव, बुलडाणा, जाफराबाद, चिखली आदी ठिकाणचे अडीच हजार शेतकरी पिंपळगाव रेणुकाईत मिरची विक्रीसाठी आणतात. सिल्लोड, भोकरदन, औरंगाबाद, जळगाव यांसह बाहेरराज्यांतील जवळपास पंचवीस व्यापारीही येथे मिरची खरेदीसाठी येतात. त्यावरूच पिंपळगाव रेणुकाईच्या मिरचीची गोडी अनेकांना लागल्याचे स्पष्ट होते. अर्थात, बाजार समितीने या ठिकाणी अधिकाधिक सुविधा द्याव्यात, परिसराचा विकास करावा, अशी अपेक्षाही व्यक्‍त होते. 

बेरोजगारांना मिळाले काम 
पिंपळगाव रेणुकाईच्या मिरची मार्केटमुळे परिसरातील सहाशे बेरोजगारांना काम मिळाले आहे. दिवसाकाठी एक मजूर हजार रुपयांची कमाई करतो. शिवाय दीडशे छोटी-मोठी वाहने बाजारात मालाची ने-आण करतात. यामुळे वाहनचालक, सहायक, वाहनमालक असे किमान तीनशेजण मार्केटमुळे उत्पन्न मिळवितात. याप्रकारे जवळपास नऊशे जण या मार्केटमुळे संसाराचा गाडा ओढत आहेत. 

 
मिरचीची आवक वाढत आहे. सध्या मार्केटला जवळपास सातशे टन मिरची येत आहे. ही मिरची मोठ्या व्यापाऱ्यांमार्फत राज्यातच नाही तर देश-परदेशांतही जात आहे. येथील मिरचीचा दर्जा चांगला असल्याने मोठी मागणी आहे. 
- प्रीतम बेराड, व्यापारी 

दुष्काळात मिरचीसाठी पाणी साठवण करून ठेवले होते. शिवाय वरुणराजानेही यावर्षी चांगली साथ दिली. यामुळे दुष्काळात मिरचीचा शेतकऱ्यांचा सहारा बनली. यंदा दोन लाखांची मिरची विकली असून भाव स्थिर राहिल्यास अजून तीन लाखांची अपेक्षा आहे. 
- दिलीप सपकाळ, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chili business In Pimpalgaon