एका बाकावर तीन परीक्षार्थी, दुकानाच्या शटरमध्येही गर्दी! 

संदीप लांडगे
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

बारावीच्या पहिल्याच पेपरला बोर्डाने सांगितलेले नियम सर्व धाब्यावर बसवत काही केंद्रांमध्ये एकाच बाकावर एक, दोन नव्हे तर चक्क तीन विद्यार्थ्यांनी एकत्र बसून परीक्षा दिली. इतकेच नव्हे तर पोरगाव (ता. पैठण) या केंद्रावर दुकानाच्या शटरमध्ये विद्यार्थ्यांना खाली बसवून बारावीची परीक्षा घेण्यात येत होती. 

औरंगाबाद - बारावीच्या पहिल्याच पेपरला बोर्डाने सांगितलेले नियम सर्व धाब्यावर बसवत काही केंद्रांमध्ये एकाच बाकावर एक, दोन नव्हे तर चक्क तीन विद्यार्थ्यांनी एकत्र बसून परीक्षा दिली. इतकेच नव्हे तर पोरगाव (ता. पैठण) या केंद्रावर दुकानाच्या शटरमध्ये विद्यार्थ्यांना खाली बसवून बारावीची परीक्षा घेण्यात येत होती. 

गुरुवारी (ता.21) बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. विद्यार्थ्यांची कुठली गैरसोय होणार नसल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, बोर्डाने सांगितलेल्या सर्व बाबी फोल ठरल्याचे चित्र अनेक केंद्रांतून समोर आले आहे.

औरंगाबादपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या पोरगाव येथील (कै.) केसाबाई हायस्कूल परीक्षा केंद्रावर एका बाकावर बसून एक, दोन नव्हे तर चक्क तीन-तीन परीक्षार्थींनी एकत्र बसून इंग्रजीचा पेपर सोडविला. त्यासाठी एकाच हॉलला दोन नंबर देण्यात आले होते. तर तीन ते चार वर्गांमध्ये विद्यार्थी खाली बसून पेपर सोडवत होते. गंभीर बाब म्हणजे, दुकानाच्या दोन उघड्या शटरमध्ये परीक्षार्थींची "सोय' करण्यात आली होती. या शटरला दरवाजा नसल्याने हिरव्या मॅटने फक्त आडोसा करण्यात आला होता. तर अनेक वर्गांत शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रश्‍नांची उत्तरे सांगतानाही दिसत होते. विभागात बैठे आणि 32 भरारी पथके तैनात केलेले असताना पहिल्याच पेपरला एकही भरारी पथक या भागात फिरकले नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा ही संकल्पना फक्त बोर्डाच्या कागदावर दिसत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. 

यावर्षी औरंगाबाद विभागातून एक लाख 65 हजार 351 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. त्यामध्ये केसाबाई हायस्कूलच्या केंद्रामध्ये 924 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी सोय करण्यात आली; परंतु सोयीपेक्षा गैरसोयींचा सामना जास्त करावा लागत असल्याचे काही परीक्षार्थींनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यांनी सांगितले, की परीक्षेसाठी खाली बसवण्यात आले असल्याने मांडीवर पेपर ठेवून परीक्षा द्यावी लागली. अनेकजण खिडकीत येऊन मोठ्याने ओरडत होते. तसेच बाहेरून सतत लोकांची ये-जा सुरू असल्याने पेपर लिहिताना अडचणी येत होत्या. 
 
उत्तरांसाठी स्मार्टफोन, व्हॉट्‌सऍपचा वापर 
बारावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरे पुरविण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करण्यात येत असल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या बाहेर उभे असलेले अनेक तरुण पुस्तकामधून उत्तरे शोधून फोनवरून परीक्षार्थीला सांगताना दिसत होते. तर काहीजण उत्तरे पाठवण्यासाठी व्हॉट्‌सऍपचा वापर करतानाही दिसत होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitinga in HSC exams