Coronavirus - जामखेड, नगरमुळे आष्टीकरांचा वाढला ताप, दररोज नव्वद गावांचा संपर्क

अनिरुद्ध धर्माधिकारी
Wednesday, 29 April 2020

आष्टी-नगर हद्दीला लागून असलेल्या तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. हा रुग्ण नगर शहरात काही काळ वास्तव्यास होता. तेथून गावाकडे आल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.

आष्टी (जि. बीड) - कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावापासून दूर असलेल्या बीड जिल्ह्यात पहिला रुग्ण आष्टी तालुक्यात सापडला. त्याचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव्ह आल्याने आष्टी व पर्यायाने बीडकरांचीही या संकटातून सुटका झाली असली तरी जामखेड व नगर यामध्ये असलेल्या आष्टी तालुक्याची त्यामुळे चांगलीच कोंडी होताना पाहायला मिळत आहे.

मोठ्या संख्येने पुणे-मुंबईतून स्थलांतर होऊनही बीड जिल्हा कोरोनाच्या संकटापासून दूर राहिला. दरम्यान, आष्टी-नगर हद्दीला लागून असलेल्या तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. हा रुग्ण नगर शहरात काही काळ वास्तव्यास होता. तेथून गावाकडे आल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने अधिकच सतर्क होत हा भाग पूर्णपणे सील केला. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

सध्या आष्टी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे; परंतु आष्टीकरांची यामुळे चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात जामखेड असून, त्यासाठी आष्टी पार करून जावे लागते. नगर व जामखेडला आष्टीची सीमा लागून आहे. दैनंदिन व्यवहारासाठीही जामखेड व नगरशी जनतेला कायम संपर्क असतो. विशेषतः आठवडे बाजार व शेतमालासाठी या दोन ठिकाणी तालुक्यातील शेतकरी आवर्जून जातात; परंतु सध्या नगर आणि जामखेड या ठिकाणी कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ बनलेली आहेत. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीसाठी नेहमी संपर्क असलेल्या अनेक गावांचा जामखेड व नगरशी संपर्क होऊ शकत नसल्याने शेतमाल, दूध व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जामखेडशी तालुक्यातील सुमारे ३५, तर नगरशी सुमारे ५५ गावांचा दररोजचा संपर्क आहे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्यात अडथळे येत आहेत. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होत असताना कोरोनापासून मुक्त असूनही जामखेड व नगरमुळे आष्टीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनचा कालावधी पुढे वाढणार का, याबाबत उत्सुकता आहे. लॉकडाऊन संपले तरी जामखेड व नगरमुळे आष्टीकरांना काही काळ सीलबंद राहावे लागण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The citizens of Beed were horrified by the patients of the Nagar Distrcit