शहराच्या विकासाचे व्हिजन मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे, नागरिकांना विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची झालेली बदली रद्द करावी, अशी मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली. 

हिंगोली : हिंगोली शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी एक अधिकारी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची ओळख आहे. नुकतीच त्यांची बदली झाल्याने त्याविरोधात हिंगोलीकर एकवटले आहेत. रामदास पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप छान प्रयत्न केले आहेत. शहरात वेगवेगळ्या शासकीय योजना राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून त्यांनी खूप चांगल्या चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली होती. 

सामाजिक संघटना, राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांचा पुढाकार 
हिंगोली शहरातील नागरिकसुद्धा त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करत आहेत. (ता.सहा) जुलै त्यांची बदली झाल्याचे वृत्त कळाले. तसे आदेशसुद्धा प्राप्त झाले असून त्यांना तातडीने (ता.सात) जुलै रोजी उपस्थित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अचानक बदली झाली म्हणून शहरातील नागरिक उलटसुलट चर्चा करत आहेत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अचानक बदली झाल्यामुळे हिंगोली शहर विकासाच्या बाबतीत परत दहा वर्षे मागे जाणार हे मात्र निश्चित असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. शहरातील नागरिक रामदास पाटील यांची अचानक झालेली बदली स्थगित करण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्नदेखील करीत आहेत. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीदेखील बदलीला स्थगिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून बदली रद्द करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान आज दिवसभर शहरात सोशल मीडियावर श्री. पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामा बाबतची माहितीही सोशल मीडियावर झळकत होती. अनेकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. 

हेही वाचा - कोरोना अपडेट : नांदेडला २१ वा बळी, एकूण बाधित रुग्णांची संख्या ४५८

मुख्याधिकारी रामदास पाटील यांची मुंबई येथे बदली 
शहराच्या विकासासाठी महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या मुख्याधिकारी रामदास पाटील यांची नवी मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर हिंगोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. हिंगोली मुख्याधिकारीपदाचा पदभार घेतल्यापासून अनेक विविध विकास कामांमध्ये दबंग अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी भूमिका बजावली. घरकुल योजनेपासून ते भूमिगत गटार योजना व शहरातील अतिक्रमण हटाव यासह रस्ते विकास योजने अंतर्गत होणारी कामे रामदास पाटील यांच्यामुळे पार पडली. शहरातील अनेक वादग्रस्त विषय त्यांच्या भूमिकेमुळे पार पडली. सोमवारी सायंकाळी शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार त्यांची नवी मुंबई सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे हिंगोली शहरातील विकासप्रिय नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. 

हेही वाचा - Video - निम्म्या पगारात कसा करावा उदरनिर्वाह?, कोण म्हणतं? ते वाचाच

श्री.पाटील यांच्या जागी डॉ.अजय कुरवाडे यांची नियुक्ती 
बदलीच्या पार्श्वभूमीवर रामदास पाटील यांनी हिंगोली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह प्रशासनातील सर्व व अधिकाऱ्यांचे आभार मानले. दरम्यान, श्री.पाटील यांच्या जागी वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.डॉ. कुरवाडे यांनी लॉकडाउन काळात कारंजा नगरपालिका अंतर्गत मोठे काम उभे केले. रस्त्यावर उतरून काम करणारे अधिकारी म्हणून डॉ. कुरवाडे यांची ओळख आहे. मात्र, श्री.पाटील यांनी हिंगोली नगरपालिका अंतर्गत उभे केलेले काम हिंगोलीकरांसाठी महत्त्वपूर्ण असून हे काम पुढे नेण्याचे आव्हान आता डॉ. कुरवाडे यांच्यापुढे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens have faith in the vision of development of the city, Chief executive officer Patil, hingoli news