नागरिकांनी स्वयंशिस्‍त पाळावी : तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे

संजय कापसे
Saturday, 28 March 2020

नागरिकांप्रमाणेच काही दुकानदारही सुरक्षीत अंतराचा नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वयंशिस्त लावून घेणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार श्री. वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले.

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराची पार्श्वभूमी पाहता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांनीही आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेत स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी शुक्रवारी (ता.२७) व्यक्त केले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊन व जमावबंदीच्या आदेशानंतर नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर येणाऱ्या नागरिकांकडून प्रशासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांप्रमाणेच काही दुकानदारही सुरक्षीत अंतराचा नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. 

हेही वाचा ट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक

नागरिकांनी सुरक्षितता पाळावी

या आजाराला पळवून लावण्यासाठी सुरक्षीत अंतर हेच एकमेव रामबाण उपाय आहे. थोडावेळ घरात राहून बाहेर पडत असल्याने स्वतः व कुटुंबांनाही अडचणीत आणण्याचा प्रकार करीत आहात. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता पाळावी, शासनाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक नियमांचे काटेकोर पालन करावे, खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना नागरिक व व्यवसायिक किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांनी नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 दुकानावर गर्दी करू नये

 नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिक अथवा नागरिकाविरुद्ध कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी एक दिवस आड सुरू राहणाऱ्या किराणा दुकान व भाजी विक्रेत्यांच्या दुकानावर गर्दी करू नये, एकमेकांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवून खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे गरजेचे आहे. कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी उपायोजना करण्यात आलेले नियम नागरिकांनी स्वतःहून पाळले पाहिजेत, त्याकरिता प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वयंशिस्त लावून घेणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार श्री. वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

दरम्‍यान, कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी प्रशासनाने येथील सामाजिक न्याय भवन मुलींच्या शासकीय वसतीगृहात पन्नास खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी, उपजिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने, तालुका आरोग्य अधिकारी रौफ शेख यांनी भेट देऊन पाहणी केली.

येथे क्लिक करावाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

शहरात होणारी गर्दी चिंतेचा विषय

दरम्यान, येथील भाजीमंडईमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. यातून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत असून यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे. प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात असताना शहरात होणारी गर्दी चिंतेचा विषय बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should follow self-restraint: Tahsildar Kailas Chandra Waghmare