कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार - माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन फेटाळला 

पांडुरंग उगले 
बुधवार, 18 मार्च 2020

माजलगाव नगरपालिकेतील साडेपाच कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज माजलगाव न्यायालयाने बुधवारी फेटाळला.

माजलगाव (जि. बीड)  : माजलगाव नगरपालिकेतील साडेपाच कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज माजलगाव न्यायालयाने बुधवारी फेटाळला. आठ दिवसापासून न्यायालयीन कोठडीत असलेले चाऊस यांना जामीन मिळावा यासाठी सोमवारी माजलगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी घेऊन बुधवारी (ता.१८) न्यायालयाने निकाल देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यामुळे चाऊस यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. 

माजलगाव नगर परिषदेला १४ व्या वित्त आयोगासह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीतून कोट्यवधींच्या तक्रारीवरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावरून एकूण पाच कोटी ५७ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये प्रथम एक कोटी ४४ लाख रुपयाच्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्याधिकारी बी.सी. गावीत यांच्यासह तीन तिघाजनावर तर, आठ दिवसानंतर पुन्हा चार कोटी १३ लाख रुपयाच्या भ्रष्टाचारप्रकरणी बी.सी. गावती, हरीकल्याण एल्गट्टी, लक्ष्मण राठोड या तीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल अशोक रांजवन, अशोक कुलकर्णी, आनंद हजारे, सुर्यकांत सूर्यवंशी सात जनावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना अटक करून जमीन मंजूर झाला होता; परंतु इतर संशयित आरोपी फरार होते.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश
मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांच्यासह नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना ता. ४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर नगराध्यक्ष चाऊस यांना ता. ११ पर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. पुन्हा हा जामीन रद्द करत चाऊस यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्यांची बीडच्या कारागृहात रवानगी केली होती.

हेही वाचा - परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

जामीन मिळावा यासाठी चाऊस यांनी वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी (ता. १६) सुनावणी घेण्यात येऊन आजपर्यंत निकाल राखून ठेवला होता. बुधवारी सकाळीच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह लेखापाल अशोक कुलकर्णी यांचाही जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने सहाल चाऊस यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

लेखापाल कुलकर्णीचीही जामीन फेटाळली 
नगराध्यक्ष चाऊस यांच्यासोबत लेखापाल अशोक कुलकर्णी यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे, परंतु मुख्याधिकारी हरिकल्याण एल्गट्टी यांना मात्र ता. ११ रोजीच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City President Chaos's bail was rejected