माजलगावचे नगराध्यक्ष चाऊस यांचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

माजलगाव नगरपालिकेतील १४ व्या वित्त आयोगासह विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीतून पाच कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये आठ दिवसांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

माजलगाव (जि. बीड) - नगरपालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज शुक्रवारी (ता. तीन) जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याचीही चाऊस यांची मागणी न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

माजलगाव नगरपालिकेतील १४ व्या वित्त आयोगासह विविध विकासकामांसाठी आलेल्या निधीतून पाच कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये आठ दिवसांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात तीन मुख्याधिकाऱ्यांसह अभियंता, लेखापाल अशा एकूण सात जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

चार मार्च रोजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ११ मार्चपर्यंत न्यायालयाने अंतरिम जमीन दिला होता. पुन्हा न्यायालयाने हा जमीन रद्द करून सहाल चाऊस यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना यापूर्वी दोनदा चाऊस यांच्यातर्फे दोन वेळा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता न्यायालयाने दोनदा तो फेटाळला. 

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

श्री. चाऊस यांना हृदयाचा आजार असून त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना पुन्हा हृदयाचा त्रास होत असून पुढील उपचार औरंगाबाद येथे घ्यावा लागत असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी न्यायालयाकडे केली होती. यावर शुक्रवारी (ता. तीन) सुनावणी घेऊन न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी चाऊस यांचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला. सरकार पक्षातर्फे ॲड. रणजित वाघमारे यांनी काम पाहिले. सहाल चाऊस यांचा तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City President Chaos's bail was rejected for the third time