शास्त्रीय नृत्यातून होते नैराश्यावर मात - स्वाती दैठणकर

सुशांत सांगवे
शुक्रवार, 11 मे 2018

लातूर - "शालेय विद्यार्थ्यांत नैराश्य वाढत आहे. नैराश्यातून ते आत्महत्येकडे वळतात. त्यांच्यात गुन्हेगारी वाढते. हे चित्र बदलायचे असेल तर शास्त्रीय नृत्य हा चांगला पर्याय आहे. याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहू नका. ही जीवनावश्यक बाब बनली पाहिजे. त्यासाठी नृत्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे", असे स्पष्ट मत ज्येष्ठ नृत्यगुरु स्वाती दैठणकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. नृत्याचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी राज्य सरकारला लवकरच पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नृत्य शिक्षणासाठी आणि नृत्य प्रसारासाठी सतत कार्यरत असलेल्या, त्यासाठी वेगवेगळ्या देशांत नृत्य मैफली सादर करून नृत्य साक्षरता वाढविण्यासाठी धडपड करणाऱ्या दैठणकर एका जाहीर कार्यक्रमानिमित्त लातूरमध्ये आल्या होत्या. या वेळी 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. नृत्य साक्षरता, नृत्य प्रसार, नृत्य अभ्यासक्रम अशा विविध विषयांवर त्यांच्याशी मनमोकळा संवाद रंगला.

दैठणकर म्हणाल्या, "शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत हे आपल्या भारतीय संस्कृतीचा खजिना आहे; पण नेमके त्याकडेच आपण दुर्लक्ष करत आहोत. नृत्यामुळे ताण हलका होतो. व्यायाम होतो. भूक लागते. व्यक्तिमत्व फुलते. चार-चौघात स्वतःचा प्रभाव कसा पडायचा, हे समजते. पौराणिक कथांमुळे चांगले संस्कार होतात. आपली संस्कृती कळायला मदत होते. अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून नृत्य फायदेशिर आहे. यामुळे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणार नाहीत. त्यांच्यातील द्वेषाची भावना कमी होईल. आत्महत्येचा मार्ग ते कधीही स्वीकारणार नाहीत. उलट साहसी, मनाने कोमल, संवादी, नम्र होतील. इतकी ताकद या कलेत आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात नृत्याचा समावेश होण्यासाठी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आजच्या काळात नृत्य हे सामाजिक पुनरुत्थानाचे  माध्यम बनले पाहिजे."

नृत्य हे शिव काळापासून आलेले आहे. त्यामुळे नृत्याचा अभ्यासक्रम मुलींबरोबर मुलांनाही हवा. यात भेदभाव होऊ नये. नृत्य शिकविण्यासाठी चांगले शिक्षक तयार झाले पाहिजेत. नृत्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान सोप्या भाषेत त्यांनी मुलांना सांगायला हवे, अशी अपेक्षाही दैठणकर यांनी व्यक्त केली.

"संगीताप्रमाणे नृत्याचाही प्रसार गावागावापर्यंत झाला पाहिजे. नृत्यातून आनंद घेणे आणि तत्वज्ञान समजून घेणे जमले पाहिजे. नृत्य प्रसारासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न नक्कीच आशादायी आहेत."
- स्वाती दैठणकर, नृत्यगुरु

Web Title: classical dance helps to overcoming from depression, Swati Deethankar