तीन दिवसांपासून तूर खरेदी बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

माजलगाव - बारदाना उपलब्ध नसल्यामुळे बुधवारपासून (ता. 19) येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद आहे. शनिवारी (ता. 22) शासनाची खरेदी बंद होणार असून अद्यापही केंद्रावर शेतकऱ्यांची अंदाजे 25 हजार क्विंटल तूर पडून असल्याने त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. वशिलेबाजीमुळे आतापर्यंत व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात मापे झाली असून शेतकऱ्यांची तूर मात्र शिल्लक राहिली आहे. 

यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असले, तरी बाजारभाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दोन महिन्यांपूर्वी नाफेडमार्फत हमीभावाने तूर खरेदी सुरू केले होते. शहराच्या बाहेर नवीन मोंढा आवारात शासकीय तूर खरेदी सुरू आहे. दोन महिन्यांत या ना त्या कारणाने हे खरेदी केंद्र अनेकवेळा बंद पडल्याने मापे झाली नाहीत. दोन महिन्यांच्या कालावधीत या केंद्रावर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व्यापाऱ्यांनी त्यांची मोठ्या प्रमाणात तूर विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांचा क्रमांक महिनाभर लागत नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी शासनाने तूर खरेदीची मुदत वाढवून देत 22 पर्यंतच खरेदी करण्याचे आदेश दिले होते. असे असताना शेवटच्या तीन दिवसांत बारदाना संपल्याने बुधवारपासून (ता. 19) येथील खरेदी केंद्र बंद आहे. अद्यापही अंदाजे 25 हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने यापुढे मुदतवाढ न दिल्यास शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांना बेभाव विक्री करावी लागणार असल्याने मोठे नुकसान होणार आहे. बाजार समिती, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करूनही शुक्रवारी (ता. 21) रात्री उशिरापर्यंत बारदाना उपलब्ध झाला नव्हता. 

बाजार समितीचे वरातीमागून घोडे 
बारदाना नसल्याने तीन दिवसांपासून खरेदी केंद्र बंद आहे. शनिवारी (ता. 22) शासनाची खरेदी बंद होणार असताना बाजार समिती पदाधिकारी बारदान्यासाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याने हा प्रकार "वरातीमागून घोडे' असाच आहे. वास्तविक पाहता शेवटच्या दिवशी बारदान्यासाठी नव्हे तर मुदतवाढ देण्यासाठी आंदोलन करायला हवे होते.

Web Title: Closed purchase Tur

टॅग्स