कृषितंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची थंडीत कुडकुड सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषितंत्र विद्यालयाच्या पैठण रोड वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ऐन थंडीत कुडकुडत राहावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने त्यांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वसतिगृहाच्या काचा फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क कागदाचे पुठ्‌ठे लावावे लागत आहेत. वसतिगृहात घूस, उंदरांचा मुक्तसंचार सुरू असून फरशींचीही दुरवस्था झाली आहे. वसतिगृहातील एकाही खोलीत लाईट बोर्ड सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. वसतिगृहाचे बांधकाम हे 1985-86 चे असल्याने इमारतीचा काही भाग मोडकळीस आला आहे. विद्यालयातर्फे इमारत बळकटीकरणासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव दिला खरा, मात्र हा प्रस्ताव साधारण वर्षभर विद्यापीठाकडेच धूळखात पडून आहे.

"सकाळ' यापूर्वी वसतिगृहाच्या दुरवस्थेविषयी आवाज उठविल्यानंतर वसतिगृहाची साफसफाई करण्यात आली खरी, मात्र केवळ एवढ्यावरच बोळवण करण्यात आली. वसतिगृहात राहणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना महागड्या खोल्या भाड्याने घेऊन राहाणे शक्‍य नाही. परिणामी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत राहावे लागत आहे. याच विद्यार्थ्यांमधून भावी शास्त्रज्ञ तयार होणार आहेत. त्यांच्या जिवाशी खेळ खेळणे विद्यापीठाने थांबवावे, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली.

Web Title: cold weather in krushi vidyapeeth