
गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मानवी जीवन आणि शेती पिकावर परिणाम होत आहे. अगोदरच कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने मनात घर करून ठेवलेले आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मानवी जीवन आणि शेती पिकावर परिणाम होत आहे. अगोदरच कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने मनात घर करून ठेवलेले आहे. त्यात गारठ्याने सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवत असल्याने लोकामध्ये आजाराचा संशय वाढतोय. दरम्यान ढगाळ वातावरणाने शेती पिकावर विशेषतः तुरी पिकावर अळ्यांचा प्रार्दुभाव वाढण्याला जणू निमंत्रणच मिळाले आहे. हरभरा पिकावरही अळ्यांचा प्रहार वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.
कोरोना संसर्गाने नागरिकांचे जीवनमानच बदलून टाकले आहे. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरानाचा संसर्ग झाला. त्यातून ९७ टक्के लोक बाहेर येऊ शकले. मात्र त्यासाठी झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाने लोकांना भयभीत करून टाकले होते. अनेकांना खासगी रुग्णालयाच्या उपचार खर्चाचा भुर्दंड सोसावा लागला. ५५ लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या एक महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र प्रभावी लक्षणे नसलेल्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा अर्थ कोरोना संसर्ग गेलेला नाही. कोरोना सोबतच राहुन सावधानगिरी बाळगत जीवन जगावे लागणार आहे.त्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिक सर्दी, खोकल्याच्या भितीने स्वतःला सावरत आहेत. गारठ्याने शिंका येतात. याचा अर्थ कोरोनाची लक्षणे असा होऊ शकत नाही. मात्र संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या शिंका, खोकल्याने धोका होऊ शकतो. हेही तितकेच खरे आहे. थंडी, गारठ्याने नागरिक उबदार कपडे वापरत असल्याचे दिसत आहे.
तूर, हरभऱ्यावर अळ्यांचा प्रहार !
खरीप हंगामातील उडीद, मूगाचे उत्पन्न जेमतेम निघाले. तूर पिकाने तग धरले.मात्र फुलोरा व फळधारणेच्या स्थितीत असलेल्या तूरीच्या पिकावर आता अळ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात तीन दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण या पिकाला धोकादायक ठरत आहे. उशीरा पेरणी केलेल्या हरभऱ्याचे पिक काही ठिकाणी डोलावत आहे. मात्र त्यावर अळ्या, किडींचा मारा होण्याचा धोका वाढत आहे.
संपादन - गणेश पिटेकर