esakal | जालन्यात चोरट्यांचा प्रताप, साडेअठ्ठावीस लाखांसह एटीएम मशीन पळविले
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

मागील काही महिन्यांपासून जालना जिल्ह्यात घरफोड्या, चोऱ्या, दुचाकी चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी होत चालल्याचे चित्र आहे.

जालन्यात चोरट्यांचा प्रताप, साडेअठ्ठावीस लाखांसह एटीएम मशीन पळविले

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोड्या, चोऱ्या, दुचाकी चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी होत चालल्याचे चित्र आहे. अशात आता चोरट्यांनी पुन्हा एटीएम मशीनला लक्ष्य करत चक्क जालना येथील औद्योगिक वसाहतीतून साडेअठ्ठावीस लाखांसह एटीएम मशीन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत शुक्रवारी (ता.२७) रात्री लंपास केली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औद्योगिक वसाहत परिसरात नागेवाडी येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीनची शुक्रवारी रात्री चोरट्यांनी रेकी केली. त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शुक्रवारी रात्री एटीएम मशीनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून साडेअठ्ठावीस लाखांच्या रोकडसह एटीएम मशीन स्कॉर्पिओ जीपमध्ये टाकून पसार झाले. या एटीएममध्ये २८ लाख ६७ हजार ६०० रुपये होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्राकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या या पोलिसांना आव्हान देणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे आता पोलिस प्रशासन चिरट्यांचे आव्हान पेलून त्यांना आधी जेरबंद करतात हे पाहावं लागणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top