esakal | जिल्हाधिकारी आंचल गोयल बाजारपेठ उतरल्याने बाजारपेठेत ‘लॉकडाउन’
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कारवाईने बाजारपेठेत खळबळ उडाली

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कारवाईने बाजारपेठेत खळबळ उडाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी: आंजारले...गोंजारले...., घरोघरी जाऊन जनजागृतीही केली... वारंवार आवाहनही केले... परंतु प्रशासनाच्या या सौम्य रुपाला, लसीकरणाच्या आवाहनाला दाद, प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु रविवारी (ता. १२) जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपले रौद्र रुप दाखवले. महानगरपालिका प्रशासनाला सोबत घेऊन अख्खी बाजारपेठ पालथी घातली.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

लस न घेतलेल्यांची दुकाने बंद करून त्यांना लसीकरणासाठी पिटाळले. विनामास्क फिरणाऱ्यांच्या स्वतः पावत्या फाडल्या. तर श्रीमती गोयल यांच्या धडाक्याने लसीकरण न झालेली निम्मी दुकाने आपोआप बंद झाली. कच्छीबाजारमध्ये तर अपवाद वगळता शुकशुकाट पसरला होता.

प्रशासनाचा बाजारपेठेवर हल्लाबोल; लसीकरणाची सुविधा

गणपती, महालक्ष्मी सणानिमित्त शहराच्या शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, आरआऱ. टावर, सुभाष रोड, कच्छी बाजार, जनता मार्केट या मुख्य बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. सर्व रस्ते व्यापारी, दुकानदार, पथविक्रेते यांच्यासह ग्राहकांनी हाऊसफुल झाले होते. अशातच रविवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह महापालिकेचा ताफा बाजारपेठेत उतरला.

एकीकडे गोयल, दुसरीकडे आयुक्त देविदास पवार तर तिसरीकडे अतिरीक्त आयुक्त रणजीत पाटील यांची तीन पथके तीन रस्त्याकडे वळाली. प्रत्येक दुकानावर जाऊन लसीकरणाची चौकशी सुरू झाली. जिथे लसीकरण झाले नाही, त्यांची दुकाने बंद केली. लसीकरण झाल्याशिवाय दुकाने उघडली नाही पाहिजेत, असेही त्यांना पालिका प्रशासनाने सांगीतले. तर शिवाजी चौक येथे उभारलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी अनेकांना पिटाळले. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या ग्राहकांना देखील अडवून त्यांच्या हातात दंडाच्या पावत्या दिल्या. लस न घेता व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने उचलण्याच्या सूचना दिल्या.

सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, लक्ष्मण जोगदंड, शेख शादाब, श्रीकांत कुरा यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी फळी या कारवाईत उतरल्याने बाजारपेठेत भूकंप झाल्याची परिस्थिती होती. दुकानांना सील ठोकण्याच्या भितीने अनेकांची दुकाने बंद करण्यासाठी, रस्त्यावरील साहित्य उचलण्यासाठी, नोकरांना पिटाळण्यासाठी, रस्त्यावरील दुकाने हलविण्यासाठी अक्षरशः तारांबळ उडाली होती.

कारवाईच्या धसक्याने निम्मी बाजारपेठ बंद

जिल्हाधिकारी गोयल यांच्या कारवाईने बाजारपेठेत खळबळ उडाली. गोयल येत असल्याचे चाहुल लागताच लसीकरण न झालेल्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून पोबारा केला. काहींनी लसीकरण न झालेल्या नोकरचाकरांना बाहेरचा रस्ता दाखवला तर काही दुकाने गोयल यांच्या तावडीत सापडली. कच्छी बाजार, जनता मार्केट, कोठारी कॉम्प्लेक्स या भागात बहुतांश दुकाने बंद केली किंवा झाली होती.

रस्त्यावर देखील शुकशुकाट होता. कच्छीबाजार परिसरात तर गोयक यांनीच पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून पावती बुक हाती घेतले. विनामास्क फिरणाऱ्यांना अडवून त्यांनी स्वतःच पावत्या देण्यास सुरुवात केली. या कृतीने आयुक्त पवार देखील अवाक झाले. त्यांनी पावती पुस्तक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गोयल यांनी ते न देता विनामास्क दिसेल त्याच्या पावत्या फाडणे व लसीकरण झालेले न दिसल्यास दुकाने बंद करण्याची कारवाई सुरुच ठेवली.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून स्वतः जिल्हाधिकारी आंचल गोयल याच आता लसीकरणाला गती देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये आता ही कारवाई आता सुरूच ठेवली जाणार आहे. शहरातील सर्व घटकांनी आपले, कुटूंबीयांचे लसीकरण करून घ्यावे. तरच आपण तिसऱ्या लाटेला रोखू शकतो.- देविदास पवार, आयुक्त, मनपा, परभणी

loading image
go to top