धान्य बँकेला सुरवात : वाचा कुठे?

कृष्णा पिंगळे
Saturday, 2 May 2020

सोनपेठ (जि.परभणी) येथील महिलांचा अनोखा उपक्रम; सोळा क्विंटल धान्य करण्यात आले जमा

सोनपेठ  (जि.परभणी)  : कोरोना लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून या काळात महिलांनी एकत्र येत गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी धान्य बँकेची अनोखी संकल्पना राबवली आहे. या धान्य बँकेत आतापर्यंत सोळा क्विंटल धान्य जमा करण्यात आले आहे.
‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन कोरोनामुळे शहरी भागातील महिलांची होणारी अडचण लक्षात घेऊन एका धान्य बँकेची अनोखी संकल्पना राबवली आहे. कोरोना लॉकडाउनमुळे शहरी भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक खासगी नोकरी करणारे यांचा रोजगार बुडाला आहे. जवळची असलेली जमा पुंजी व असलेले धान्य संपल्यानंतर सन्मानाने व स्वाभिमानाने जगणाऱ्या अनेक कुटुंबाना कोणाकडे हात पसरणे अवघड वाटत होते. परंतु घरातील अन्नधान्य संपल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.

हेही वाचा :  घरी जायची ओढ लागली मग, ‘या’ लिंकवर अर्ज करा

१७० गरजू कुटुंबाना होणार वाटप
शहरी भागातील या कुटुंबांची व्यथा बचत गटातील महिलांनी सर्वोदय साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सय्यद नसीमा यांच्याकडे बोलून दाखवली. सय्यद नसीमा यांनी या समस्यांची चर्चा आपल्या सहकाऱ्यांशी केली. तसेच यातून धान्य बँकेची अनोखी संकल्पना जन्माला आली. या धान्य बँकेसाठी धान्य गोळा करण्याचे काम प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांनी केले. दोनच दिवसात या धान्य बँकेत गहू, तांदूळ, ज्वारी, तूरडाळ, तिखट, हळद, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे सोळा क्विंटल साहित्य जमा झाले. हे सर्व साहित्य सर्वोदय साधन केंद्राच्या माध्यमातून शहरातील तब्बल १७० गरजू कुटुंबाना वाटण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सर्वोदय साधन केंद्राच्या माध्यमातून सोनपेठ शहरात अंदाजे शंभर महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटांच्या मार्फत शहरातील १७० गरजू कुटुंबाना ही जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

हेही वाचा : मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन
या धान्य बँकेमार्फत गरजू कुटुंबाना आवश्यक त्या वस्तू घेऊन जाता येतील व गरज संपल्यानंतर परत आणून देता येतील. या धान्य बँकेचे महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवारी (ता.एक) सोनपेठ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन जारण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वोदयच्या अध्यक्ष नीता धाकपाडे, उमा अवताडे, सुलोचना सोळंके, व्यवस्थापिका सय्यद नसीमा, विजयमाला ठेंगे, विजयश्री वडकर, गीतांजली नासे, पूजा इंदूरकर, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of grain collection for the needy Parbhani News