आयुक्‍तांना माझी कामे ऐकावीच लागतील - भगवान घडामोडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

औरंगाबाद - प्रशासन व शासन दोघांनी एकत्रित कामे केली तरच शहराचा विकास होतो. आयुक्‍तांना मी "बेकायदेशीर' कामे सांगणार नाही, पण माझी "कायदेशीर' कामे त्यांना करावीच लागतील, असे नवनिर्वाचित महापौर भगवान घडामोडे यांनी स्पष्ट केले. खड्डेमुक्‍त शहर केल्यानंतरच मी जाहीर सत्कार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तरच माझा जाहीर सत्कार होऊ शकतो, असा टोलादेखील महापौरांनी गुरुवारी (ता. 15) पत्रकारांशी बोलताना लगावला.

औरंगाबाद - प्रशासन व शासन दोघांनी एकत्रित कामे केली तरच शहराचा विकास होतो. आयुक्‍तांना मी "बेकायदेशीर' कामे सांगणार नाही, पण माझी "कायदेशीर' कामे त्यांना करावीच लागतील, असे नवनिर्वाचित महापौर भगवान घडामोडे यांनी स्पष्ट केले. खड्डेमुक्‍त शहर केल्यानंतरच मी जाहीर सत्कार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तरच माझा जाहीर सत्कार होऊ शकतो, असा टोलादेखील महापौरांनी गुरुवारी (ता. 15) पत्रकारांशी बोलताना लगावला.

महापौर भगवान घडामोडे यांची बुधवारी (ता. 14) विशेष सर्वसाधारण सभेत निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यानंतर पदभार घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी ते सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महापौर दालनात दाखल झाले. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या ताफ्यात दाखल झालेल्या क्‍विक रिस्पॉन्स व्हॅनचे उद्‌घाटन श्री. घडामोडे यांनी केले. पहिल्या दिवसाच्या कामकाजासंदर्भात बोलताना ते म्हणाले, महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून विविध अनुदानापोटी 109 कोटी रुपयांचे येणे आहे. त्यासाठी नेत्यांना भेटून पाठपुरावा करणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी एलबीटी व मालमत्ता कराच्या वसुलीवर भर दिला जाणार आहे. मालमत्ता कराची थकबाकी वाढत असल्याने चालू वर्षाचाही कर वसूल होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे थकबाकीचा विषय बाजूला ठेवून चालू वर्षाची तरी वसुली व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे; जेणेकरून उत्पन्नात भर पडेल. 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत वार्षिक अंदाजपत्रकातील मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.

शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या निधीतून गल्लीबोळांतील छोटे रस्ते करण्याऐवजी मोठे रस्ते तयार करण्यावर भर दिला जाईल. कोणते रस्ते प्राधान्याने आधी करावे लागतील यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांची मी स्वत: मते जाणून घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आयुक्‍त व पदाधिकारी यांच्यातील वादाच्या इतिहासाचा संदर्भ देऊन आयुक्‍तांशी कसे जुळवून घ्याल, असे विचारले असता ते म्हणाले, प्रशासन व शासन हे दोघेही बरोबर असल्याशिवाय शहराचा विकास होत नाही. मी आयुक्‍तांना "बेकायदेशीर' कामे सांगणार नाही, मात्र माझी "कायदेशीर' कामे त्यांना करावीच लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहीर सत्कार अधिकाऱ्यांच्या हातात
शहर खड्डेमुक्‍त करणे हे माझे मिशन राहणार आहे. जोपर्यंत शहर खड्डेमुक्‍त करत नाही तोपर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नाही असा संकल्प करून याला किती यश येईल सांगता येत नाही, असे नमूद करून महापौर बापू घडामोडे म्हणाले, की यासाठी मी प्रयत्न करीन. माझा जाहीर सत्कार होणे हे अधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी मनावर घेतले तर सत्कार होईल; मात्र गेल्या 15 -20 वर्षांपासून अधिकारी मनावरच घेत नाहीत. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर शहराची सारी विकासकामे मार्गी लागतील.

Web Title: Commissioner my works will listen