संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य

कृष्णा जोमेगावकर
Monday, 6 April 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश दिले आणि या विद्यार्थ्यांची व्यवस्था देगलूरच्या शासकीय औद्योगिक संस्थेच्या इमारतीत केली. तिथं या विद्यार्थ्यांची निवास, भोजन आदी सर्वच बाबींची सोय करण्यात आली.

नांदेड : लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉकडाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. परंतु तो पर्यंत जिल्हाबंदीचा आदेश आल्यामुळे ते नांदेड जिल्ह्यात अडकले. या विद्यार्थ्यांच्या मदतीचा जिल्हा प्रशासन धावून आले. त्या सर्व विद्यार्थ्यांची सोय देगलूरमध्ये केली आहे.  

सातशे किलोमीटरचा पायी प्रवास 
कृषी पदवीधर असलेले हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भावी कृषी शास्त्रज्ञच किंवा प्रगतिशील शेतकरीच म्हणा ना. लॉकडाऊन मुळे सर्व प्रवासी वाहने बंद झालेली. घरी जायची ओढ, घरच्यांचा जीव काळजीत. त्यामुळे हे बहाद्दर पायीच आपल्या गावाकडे निघाले. त्यांना तब्बल जवळपास सहाशे ते सातशे किलो मिटरचे अंतर कापायचे होते. मजल दरमजल करीत ही मुलं नांदेड जिल्ह्यात तीस तारखेला पोहोचली. तोवर जिल्हाबंदी लागू झाली होती. नांदेड जिल्हा प्रशासनाने त्यांना अडवलं. ताब्यात घेतलं. या मुलांनी घरी जाण्याचा आटोकाट प्रयत्न, पण प्रशासनाने समजावून सांगितलं, विज्ञानाची पुरेशी जाण असणारे हे विद्यार्थी परिस्थितीच गांभीर्य ओळखून तिथंच थांबली.

प्रशासनाने घेतली विद्यार्थ्यांची जबाबदारी 
विद्यार्थ्यांची सगळी जबाबदारी नांदेड प्रशासनाने घेतली आहे. हे सगळे मिळून २९ विद्यार्थी आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश दिले आणि या विद्यार्थ्यांची व्यवस्था देगलूरच्या शासकीय औद्योगिक संस्थेच्या इमारतीत केली. तिथं या विद्यार्थ्यांची निवास, भोजन आदी सर्वच बाबींची सोय करण्यात आली. त्यांची व्यवस्था पाहणारे अधिकारी-कर्मचारी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना काय हवं नको ते पहात आहेत. जणू त्यांचे मोठे भाऊच.

हेही वाचा....दोन चिमुकल्यांसह महिलेची  विहिरीत उडी !

योगाभ्यासात रमले विद्यार्थी
आश्रय स्थानातील दिनचर्या एखाद्या शिबिराप्रमाणे झाली आहे. भल्या सकाळी उठून आन्हिक उरकून योगाभ्यास शिकवला जातोय. नंतर स्नान, चहा, नाश्ता, दोन वेळा पोटभर जेवण. शिबिरात वेळ घालवण्यासाठी मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईल वापरता यावा यासाठी संचार व्यवस्था. आधी सगळ्यांची वैद्यकीय तपासणी झालीय. त्यांच्या प्रत्येकाच्या घरी त्यांनाच निरोप द्यायला लावून ते इथं सुखरूप असल्याचं कळवण्यात आलं. त्यामुळे घरच्यांचा जीव भांड्यात पडलाय.

हेही वाचलेच पाहिजे....माहूरची राष्ट्रकुटकालीन पांडव लेणी दुर्लक्षितच

स्वतःला सुरक्षित समजत आहेत मुलं 
इथं घेतली जात असलेली काळजी, इथल्या सर्व व्यवस्थांमुळे ही मुलं स्वतःला सुरक्षित समजत आहेत. भाषेची अडचण ही आता अडथळा राहिलेली नाही. जिथं शब्द संपतात तिथं माणुसकीचा संवाद सुरू होतो. हृदयाशी संवाद आणि जीवलगाच आतिथ्य असलं की हे कठीण दिवसही सुखकर होतात, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. आपत्तीत आपल्या कुटुंबाकडे पायपीट करायला निघालेल्या या विद्यार्थ्यांना इथल्या वास्तव्यात त्यांची काळजी घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या रूपाने नवे आप्तेष्ट भेटलेत हेच खरं......

मीरा ढास
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Communication is heartfelt and intimate hospitality, nanded news