सेनादलांच्या अडचणींवर उपाय शोधा, बक्षिसे जिंका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

हेलिकॉप्टरसाठीचे इजेक्‍शन मेकॅनिझम, डोंगराळ भागात उडताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कमकुवत किंवा कार्यरत नसलेल्या जीपीएस यंत्रणे शिवाय चालू शकणारी यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत आपल्यासोबतच्या साथीदाराचे ठिकाण, माहिती देणारी यंत्रणा, ड्रोन ओळखण्याच्या पद्धती हे विषय या स्पर्धेसाठी आहेत

औरंगाबाद - सेना दलांना येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याचे आवाहन देशभरातील नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी "सोल्युशन टू प्रॉब्लेम' या खुल्या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले असून, यात बाजी मारणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. 

चेन्नईत 11 ते 14 एप्रिलदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित "डिफेन्स एक्‍सपो 2018' च्या निमित्ताने आयोजित "सोल्युशन टू प्रॉब्लेम' या खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून सेनादलांच्या अडचणींवर तोडगे मागवण्यात आले आहेत. हे तोडगे पॉवर पॉईंट सादरीकरण, मजकुरांसह वैयक्तिक किंवा सांघिक पद्धतीने सादर करता येणार आहेत.

हेलिकॉप्टरसाठीचे इजेक्‍शन मेकॅनिझम, डोंगराळ भागात उडताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कमकुवत किंवा कार्यरत नसलेल्या जीपीएस यंत्रणे शिवाय चालू शकणारी यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत आपल्यासोबतच्या साथीदाराचे ठिकाण, माहिती देणारी यंत्रणा, ड्रोन ओळखण्याच्या पद्धती हे विषय या स्पर्धेसाठी आहेत. एक पान बायोडाटा आणि ओळखपत्रांसह आपला प्रोजेक्‍ट defplg@defexpoindia.in वर 8 एप्रिलच्या आत दुपारी बारापर्यंत पाठवणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी www.defexpoindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: competition to suggest remedies for problems in indian armed forces