संस्थाचालकाकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

उस्मानाबाद - तालुक्‍यातील श्री दत्त सेवा मंडळ (रुईभर) संचालित खानापूर येथील केशव विद्यामंदिरच्या शिक्षकांची संस्थाचालकाकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार शिक्षकांसह सेवकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबाद - तालुक्‍यातील श्री दत्त सेवा मंडळ (रुईभर) संचालित खानापूर येथील केशव विद्यामंदिरच्या शिक्षकांची संस्थाचालकाकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार शिक्षकांसह सेवकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे. 

संस्थेतील शिक्षकांनी मंगळवारी (ता.21) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तमहाराज रुईकर व कोषाध्यक्ष (लिपिक) ए. के. मंगरुळे हे वारंवार कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करीत आहेत. शाळा बंद करतो, नोकरीवरून काढून टाकतो, तसेच खोटे-नाटे आरोप करून चारित्र्यहनन करण्याची धमकी देत आहेत. स्कूलबसचे कारण सांगून जून महिन्याचे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतनही त्यांनी घेतले असून, नव्याने तेच कारण सांगून पुन्हा 18 लाख रुपयांची मागणी कोषाध्यक्षांमार्फत करीत आहेत. 18 लाख रुपये न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली असल्याचे निवेदनात नमूद आहे. शिक्षक आणि संस्थाचालक यांचा वाद नेहमीच पाहायला मिळतो. संस्थेचे संस्थापक हे महाराज म्हणून प्रवचन देतात. समाजसुधारणेचे धडे दिले जातात. परंतु याच महाराजांच्या विरोधात शिक्षकांसह सेवकांनी तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सहशिक्षक आर. एच. सपाटे, एस. के. गादेकर, एच. पी. मोरे, जे. एस. शेरखाने, सेवक के. टी. राठोड, आर. एन. राठोड, एस. एन. सातपुते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष रुईकर यांची दूरध्वनीवरून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; मात्र महाराज हे प्रवचनात असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळण्यात आले. 

Web Title: Complained of economic exploitation