आक्षेपार्ह विधानामुळे लातूर पालिकेत गोंधळ; काँग्रेस, भाजपचे नगरसेवक आमने-सामने 

हरी तुगावकर 
Friday, 12 February 2021

हा गोंधळ झाल्यानंतर महापौरांनी सर्वांनाच सभागृहात बसण्याची परवानगी दिली.

लातूर : भाजप पक्षाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी आयुक्ताबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महापालिकेच्या शुक्रवारी (ता.१२) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला. यात काँग्रेस व भाजप पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आले. बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. यात महापौरांनी कोणी व्यक्तीगत आक्षेपार्ह विधान तसेच एकेरी शब्दाचा वापर करू नये, असे आवाहन करीत सर्वांनाच शांत राहण्याची विनंती केल्यानंतर हा प्रकार थांबला. 

पती-पत्नीचा वेदनादायी एक्झिट, लग्न सोहळा आटोपून घरी परताना...

महापालिकेत शुक्रवारी (ता.१२) ऑनलाइन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता विशेष सभेला सुरवात झाली. यात स्थायी समिती व परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यात स्थायी समितीवर भाजपच्या नगरसेवक जान्हवी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. तर परिवहन समितीवर भाजपकडून सरिता राजगिरे, तुळशीराम दुडिले यांची तर काँग्रेसकडून संजय सूर्यवंशी, नामदेव इगे, सचिन गंगावने व कलिम शेख यांची निवड करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइनच सर्व साधारण सभेला सुरवात झाली.

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

यात सुरुवातीला नगरसेवक प्रकाश पाठक यांनी नगरसचिवांच्या नियुक्तीबद्दल आक्षेप घेत ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगितले. त्यात सभा सुरु असताना विरोधी पक्ष नेता ॲड. दीपक सूळ व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर हे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल ज्या सभागृहात बसले तेथे येऊन चर्चेत सहभागी झाले. ही बाब भाजपच्या नगरसेवकांना खटकली. त्यानंतर भाजपचे सभागृह नेता ॲड. शैलेश गोजमगुंडे, पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवक सभागृहात आले.

यावेळी पहिल्यांदा गोंधळ उडाला. ॲड. सूळ व श्री. गोविंदपूरकर हे सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर सर्व नगरसेवक तिथून निघून गेले. त्यानंतर ऑनलाइन सभा सुरुच राहिली. काही वेळाने पुन्हा ॲड. गोजमगुंडे, प्रकाश पाठक, शैलेश स्वामी असे भाजपचे सर्वच नगरसेवक सभागृहात आले. यावेळी श्री. पाठक यांनी आयुक्त अमन मित्तल यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यात आयुक्तांनी देखील बदनामीप्रकरणी एफआयआरची भाषा केली. त्यात काँग्रेसचे नगरसेवक आयुक्तांच्या बाजूने राहिले. यानंतर महापौर गोजमगुंडे यांनी आक्षेपार्ह कोणी बोलू नये, ऐकेरी शब्दाचा वापर करू नये, असे सांगत सर्वांना शांत केले. 

विरोधी पक्ष नेत्यांकडून वाचन अन् मंजुरी 
हा गोंधळ झाल्यानंतर महापौरांनी सर्वांनाच सभागृहात बसण्याची परवानगी दिली. सभा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता ॲड. दीपक सूळ यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयाचे वाचन करून ते मंजूर करावेत, असा प्रस्ताव मांडला. त्याला नगरसेवक रविशंकर जाधव यांनी अनुमोदन दिले. महापौरांनी या सर्वच विषयाला मंजुरी दिली. चर्चा न करू दिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. 

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress, BJP Corporators Before Eachother In Latur Municipal Corporation Latur News