कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार - चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नांदेड - सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरेपक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने राज्यात शक्‍य असेल तेथे जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. 20) येथे पत्रकार परिषदेत दिली. नांदेडसाठी अशी आघाडी झाली असून राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष अशा प्रत्येकी एकाचा आघाडीला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

चव्हाण म्हणाले, ""गोवा, मणिपूरमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर केला असून, तो लोकशाहीला मारक आहे. स्वतःची ताकद नसतानाही अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा खटाटोप सुरू आहे. येनकेनप्रकारे सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळेच या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व राज्याच्या हितासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचा विचार झाला. या संदर्भात देशपातळीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चर्चा झाली आहे. राज्यासाठी मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करत आघाडी झाल्यास सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्याची सुरवात नांदेडपासून केली आहे.'' 

शिवसेनेलाच भाजप नकोय 
पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत काही ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत शिवसेनाही एकत्र आल्याचे दिसले. यावर चव्हाण म्हणाले, ""सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेलाही भाजप नको आहे. राज्यात भाजपशिवाय शिवसेना मदत करण्यासाठी पुढे येत असेल तर आम्हीही सहकार्य घेऊ किंवा देऊ. मात्र, याबाबत अजून राज्यपातळीवर धोरणात्मक निर्णय झालेला नाही.'' राज्यात स्थानिक पातळीवर काही ठिकाणी भाजप सत्तेत नको म्हणून शिवसेनेनेच स्वतःहून मदतीचा हात पुढे केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Congress-NCP alliance