कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भुसारे यांना मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) - गेल्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या घाटशेंद्रा (ता. कन्नड) येथील शेतकरी रामेश्‍वर भुसारे यांना पोलिसांनी मारहाण केल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची नेतेमंडळी भुसारे यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार नामदेवराव पवार यांनी मंगळवारी (ता. 28) भुसारे यांची भेट घेऊन रुग्णालयाच्या खर्च स्वरूपात आर्थिक मदत केली. 

पोलिसांच्या मारहाणीत भुसारे यांच्या तोंडाला सात टाके पडून दात खिळखिळे झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, दोनवेळचे जेवण मिळणेही कठीण आहे. शेतात गारपिटीने झालेल्या नुकसानीने आधीच मानसिक तणावाखाली असलेल्या भुसारे यांनी भरपाईचा पाठपुरावा करण्यासाठीही उसनवारी करून लढा सुरू ठेवला आहे. मुंबईतील प्रकरणाने भुसारे कमालीचे खचले आहेत. त्यांना नुकसानभरपाई मिळणे दूरच राहिले; परंतु कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. जखमी भुसारेंना उपचार करण्यासाठी पैसाही नसल्याचे कळताच माजी आमदार नामदेवराव पवार, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी भुसारे यांना मदतीचा हात दिला आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ठाकरे, समाधान गायकवाड, डॉ. तात्याराव पाटील, प्रभाकर पालोदकर, नाना लंभे, कैलास ढगे, कडुबा गवळी, शिवाजी गवरे, शेख अश्‍पाक शेख अय्युब, अशोक देशमुख, कल्याण देशमुख, रामदास बखळे, हिरामण काळे उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंग राजपूत यांनीही भुसारे यांची भेट घेऊन पक्षामार्फत मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. 

Web Title: Congress, NCP leaders helping to bhusari