नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेसचे उस्मानाबादला आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

उस्मानाबाद - नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसकडून शुक्रवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ आंदोलन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना गेटवर अडविल्याने निवेदन देण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर डकविण्यात आले. पोलिस आणि मोर्चेकरी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. 

उस्मानाबाद - नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसकडून शुक्रवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ आंदोलन करण्यात आले. यावेळी माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना गेटवर अडविल्याने निवेदन देण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर डकविण्यात आले. पोलिस आणि मोर्चेकरी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. 

देशात आठ नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर 50 दिवस उलटून गेले तरीही जिल्ह्यातील ग्रामीण जनता चलन तुटवड्यामुळे हैराण आहे. सामान्य नागरिकांना चलनतुटवड्यामुळे खात्यावर पैसे असूनही ते काढता येत नाहीत. शेतकऱ्यांनी मालाची विक्री केल्यानंतर आडत दुकानात पैसे वेळेवर मिळत नाहीत. तब्बल 15 ते 20 दिवसांनी चेकचे पैसे खात्यावर जमा होत आहेत. जमा झालेली रक्कमही बॅंकेतून वेळेवर मिळत नाही. रोख व्यवहारासाठी व्यापारी अडवून शेतमाल खरेदी करीत आहेत. मजुरांना देण्यासाठी, खते, बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम द्यावी लागते. शेतकऱ्यांकडे चेकबूक नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून याबाबत कोणतीच दखल घेतली जात नसल्याने कॉंग्रेसच्या जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, युवक कॉंग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर, नितीन बागल, श्रीकांत भुतेकर, रोहित पडवळ आदी यावेळी उपस्थित होते. 

मधुकरराव चव्हाणांना अडविले 
मोर्चातील काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तर काहींना पोलिसांनी रोखले. यावेळी माजीमंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण कार्यालयाच्या बाहेरच राहिले. त्यांना प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. पोलिसांना सांगितल्यानंतरही आमदार चव्हाण यांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरच निवेदन डकविले.

Web Title: Congress protesting against the decision of the notabandi